
‘जोया फॅक्टर’ या हिंदी चित्रपटातून दाक्षिणात्य सुपरस्टार सलमान दुलकर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात अभिनेत्री सोनम कपूर झळकणार आहे. हा चित्रपट येत्या १४ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये आता बदल करण्यात आला आहे.
आता या तारखेला रिलीज होणार सलमान-सोनमचा ‘जोया फॅक्टर’
हा चित्रपट आता सप्टेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्याची ही पहिली वेळ नाही. हा चित्रपट याआधीही ५ एप्रिलला प्रदर्शित होणार होता, पण तो जूनमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता वर्ल्ड कपच्या कारणास्तव ही रिलीज डेटदेखील बदलण्याचा निर्णय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी घेतला आहे.
अनुजा चौहान यांच्या ‘जोया फॅक्टर’ या पुस्तकावर आधारित हा चित्रपट असणार आहे. सलमान चित्रपटात भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधाराची भूमिका साकारणार आहे. तर जाहिरात एजन्सीमध्ये काम करणाऱ्या तरूणीच्या भूमिकेत सोनम दिसणार आहे. क्रिकेटवरच आधारित हा चित्रपट असल्याने सुरूवातीला तो वर्ल्ड कपच्या काळात प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला होता. पण चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनला याचा फटका बसू शकतो, त्यामुळे निर्मात्यांनी ही तारीख बदलली आहे.
