रमाबाई आंबेडकरांची व्यक्तिरेखा साकारणार अभिनेत्री शिवानी रांगोळे


अभिनेत्री शिवानी रांगोळे स्टार प्रवाहवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ महामानवाची गौरवगाथा या मालिकेत बाबासाहेबांच्या पत्नीची म्हणजेच रमाबाईंची व्यक्तिरेखा साकारणार आहे. आपण शिवानीला याआधी ग्लॅमरस रुपात पाहिले असल्यामुळे तिची ऐतिहासिक भूमिका साकारण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि त्यासाठी ती प्रचंड उत्सुकही आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याचा रमाबाई या अविभाज्य भाग होत्या. रमाबाई या बाबासाहेबांचे उच्च शिक्षण, आंदोलने आणि सत्याग्रहावेळी त्यांच्या पाठीशी सावलीप्रमाणे उभ्या राहिल्या आणि कुटुंबही त्यांनी सांभाळले. रमाबाईंनी मोठ्या निष्ठेने आणि प्रेमाने महापुरुषाची सहचारिणी होण्याचे व्रत पाळले. अशा या थोर व्यक्तीमत्वाची भूमिका साकारायला मिळणे ही खूप भाग्याची गोष्ट असल्याचे शिवानीला वाटते.

शिवानी या भूमिकेविषयी सांगताना म्हणाली, माझ्या कारकिर्दीतील ही खूप वेगळी भूमिका आहे. अतिशय समजूतदार आणि साधारण पेहराव असणारे हे पात्र आहे. माझ्यासाठी या भूमिकेसाठीचा पेहराव, भाषा या गोष्टीसुद्धा नवे आव्हान आहे. मी धनंजय कीर आणि बाबुराव बागुल या लेखकांच्या पुस्तकांचे वाचन करत आहे. मला रमाबाईंची भूमिका साकारण्यासाठी याचा फार उपयोग होत आहे. रमाबाईंचे कार्य अपार आहे. या मालिकेतून त्यांचे कार्य पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेल.

Leave a Comment