या महिलेला हवा आहे चक्क पबजी खेळणारा दादल्या


सध्याच्या तरुणाईमध्ये पबजी या गेमची क्रेझ वाढत असून आता तरुणाईसोबतच विवाहित जोडप्यांमध्येही याची क्रेझ वाढत आहे. आपण याचे कारण नुकतेच एका घटनेद्वारे ऐकले असेलच. त्याचे झाले असे की पबजी गेम पार्टनरसोबत लग्न करायचे असल्यामुळे एका महिलेने घटस्फोटाची मागणी केली आहे. समुपदेशकही महिलेच्या ह्या विचित्र मागणीमुळे चक्रावले आहेत. मुलांच्या मनावर पबजी गेममुळे विपरित परिणाम होत असल्याच्या घटना नेहमी ऐकायला मिळतात, पण ह्या गेमपायी आता चक्क एकाचा संसार मोडणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. अहमदाबाद येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

याबाबत अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका बांधकाम कंत्राटदाराची घटस्फोटाची मागणी करणारी ही 19 वर्षीय महिला पत्नी आहे. एक मुलगीसुद्धा या दाम्पत्याला आहे. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, या महिलेने मागील काही महिन्यांपासून पबजी गेम खेळण्यास सुरुवात केली होती. ती पबजी खेळताना एका युवकाच्या संपर्कात आली. हा युवक देखील रोज पबजी खेळायचा. त्यामुळे तिचे हे गेम खेळण्याचे वेड एवढे वाढत गेले की, आपल्याला पबजी गेम खेळणारा जोडीदार आवडत असून आपल्याला त्याच्यासोबतच राहायचे असल्याचे तिने समुपदेशकाला सांगितले.

ह्या महिलेने म्हणूनच महिला हेल्पलाईनकडे घटस्फोटाची मागणी केली आहे. तिच्या वडिलांनी तिच्या घटस्फोटाला विरोध केला आहे. तिच्याशी चर्चा करत असताना तिचा नवरा तिला मारहाण करतो का, असे विचारल्यास आपला नवरा आपल्याला काहीही त्रास देत नसल्याचे तिने सांगितले. पबजीच्या विळख्यात अवघी तरुणाई अडकली जात असताना आता लोकांचे संसार देखील ह्याच्या विळख्यात अडकत जात आहेत की काय असा मोठा सवाल उपस्थित झाला आहे.

Leave a Comment