एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना न खेळलेल्या न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूला विश्वचषकाची लॉटरी!


नवी दिल्ली – न्यूझीलंडचा क्रिकेट संघ २०१५ साली झालेल्या विश्वचषकात रनर-अप राहिला होता. पण यावेळी हा संघ पुन्हा एकदा दमदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. न्यूझीलंड संघातील भरवशाचा खेळाडू टॉम लाथम विश्वचषकासारख्या महत्वाच्या स्पर्धेपूर्वीच जायबंदी झाला आहे.

त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सराव सामन्यात यष्टीरक्षण करताना दुखापत झाली आहे. त्याच्या बोटाला फ्रॅक्चर झाले असून न्यूझीलंड संघासोबत टॉम लाथम इंग्लंडला जाणार आहे. पण पहिल्या सामन्यात तो खेळू शकणार नाही. त्याचसोबत तो विश्वचषकापूर्वी खेळल्या जाणाऱ्या दोन्ही सराव सामन्यात खेळणार नाही.

पर्यायी यष्टीरक्षक म्हणून न्यूझीलंडने टॉम ब्लंडेलला निवडले आहे. आतापर्यंत त्याने एकही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळलेला नाही. त्याला विश्वचषकात पदार्पणची संधी मिळू शकते. श्रीलंकेशी न्यूझीलंडचा पहिला सामना होणार आहे. याबाबत माहिती देताना निवड समितीचे प्रमुख गॅविन लार्सन यांनी म्हटले आहे, की सराव सामने लाथम खेळणार की नाही, यावर मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर निर्णय घेतला येईल.