अभिनेते कमल हसन यांच्यावर फेकली अंडी आणि दगड


चेन्नई – अभिनेता कमल हसन यांनी नथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी असे वक्तव्य केल्यानंतर त्यांना सातत्याने विरोधाचा सामना करावा लागत आहे. कमल हसन यांच्यावर गुरुवारी एका प्रचारसभेदरम्यान अंडी आणि दगड फेकण्यात आले. ही घटना तामिळनाडूमधील आरावकुरिची येथे घडली. आपले भाषण आटोपून कमल हसन हे मंचावरून उतरत असताना त्यांच्यावर दोन तरुणांनी हल्ला केला. या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. पण आता राजकारणाची पातळी खालावत चालली आहे. पण कमल हसन यांनी अशा घटनांमुळे आपण घाबरणार नाही, असे म्हटले आहे.

कमल हसन यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या हल्ल्यानंतर आरोपींवर कारवाईची मागणी केली आहे. त्याचबरोबर कमल हसन यांना पुरेशी सुरक्षा व्यवस्था न पुरवण्यात आल्याने पोलिसांवर टीका करण्यात येत आहे. दरम्यान, कोईंबतूरमधील सुलूर येथे होत असलेल्या पोटनिवडणुकीतील प्रचारासाठी कमल हसन यांना परवानगी देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.

दरम्यान, कमल हसन या घटनेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, आता राजकारणाची पातळी खालावत चालली असल्याचे मला वाटते. पण मी अशा प्रकारांमुळे घाबरलेलो नाही. प्रत्येक धर्मात त्यांचे स्वत:चे दहशतवादी आहेत. आम्ही खूप पवित्र आहोत असा दावा कुठलाही धर्म करू शकत नाही. प्रत्येक धर्मात दहशतवादी होते हे इतिहास सांगतो.

तसेच कमल हसन यांनी नथुराम गोडसेला पहिला हिंदू दहशतवादी म्हटल्याने निर्माण झालेल्या वादाबाबतही प्रतिक्रिया दिली. अटकेला मी घाबरत नाही. मला अटक करून दाखवा. पण मला अटक केल्यास ते त्यांनाच अधिक अडचणीचे ठरणार आहे. हा इशारा नाही सल्ला असल्याचा टोलाही कमल हसन यांनी लगावला.

Leave a Comment