अॅपलच्या पहिल्या दुर्मिळ कम्प्युटरच्या लिलावाला सुरुवात


1976 साली आपल्या पहिल्या पर्सनल कंप्युटरची अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी जगभरात आपली ओळख निर्माण करणाऱ्या अ‍ॅपल कंपनीने निर्मिती केली होती. कंपनीने त्यानंतर अशा 200 कंप्युटर्सची अॅपल-1 या नावाने निर्मिती केली. आता त्याच 200 कंप्युटर्सपैकी एखादा कंप्युटर तुम्हीही खरेदी करु शकता. कारण अत्यंत दुर्मिळ व मौल्यवान असलेल्या अॅपल या संगणकांचा ऑनलाइन लिलाव सुरु करणार आहे.

अॅपलने स्थापनेनंतर प्रथमच निर्मिती केलेल्या जवळपास 200 कंप्युटर्सचा लिलाव करण्याचे ठरवले आहे. हा लिलाव ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असून नुकतीच याची सुरुवात झाली आहे. लिलाव प्रक्रियेमध्ये www.christies.com या संकेतस्थळाद्वारे सहभागी होता येईल. हा लिलाव 16 मे पासून 24 मे दरम्यान सुरू असणार आहे.

चार ते साडेसहा लाख अमेरिकी डॉलर म्हणजे जवळपास 2.81 कोटी ते 4.56 कोटी रुपयांमध्ये एकेका कंप्युटरची विक्री या लिलावात होईल असा कंपनीला विश्वास आहे. अॅपलचे संस्थापक स्टिव्ह जॉब्स आणि स्टिव्ह वोजनियाक यांच्याकडे पूर्णतः असेंबल मदरबोर्डपासून पर्सनल कंप्युटर निर्मितीची कल्पना होती. पहिल्या ‘अॅपल-1’ कंप्युटरची निर्मिती त्यांनीच केली.

त्यावेळी ‘अॅपल-1’ सिस्टिमसोबत केसिंग, पावर सप्लाय, की-बोर्ड किंवा मॉनिटर नव्हता. पण प्री-असेंबल मदरबोर्ड यासोबत होता, त्यामुळे इतरांपेक्षा वेगळा हा कंप्युटर ठरला. सुरुवातीला या कंप्युटरची किंमत 666.66 डॉलर एवढी ठेवण्यात आली होती, वर्ष 1977 मध्ये किंमत कमी करुन 475 डॉलर ठेवण्यात आली. 1977 च्या अखेरीस (10 जून 1977)कंपनीने अॅपल-2 या कंप्युटरची निर्मिती केल्यानंतर कंपनीने पहिल्या कंप्युटरच्या निर्मितीवर जास्त लक्ष दिले नाही आणि अखेर ऑक्टोबर 1977 मध्ये जॉब्स आणि वोजनियाक यांनी ‘अॅपल-1’चे उत्पादन बंद करण्याची अधिकृत घोषणा केली. यानंतर ज्या ग्राहकांनी अॅपल-1 ची खरेदी केली होती त्यांना ते कंप्युटर पुन्हा कंपनीला परत करण्याचा आग्रह कंपनीकडून करण्यात आला, त्यासाठी काही ऑफर्स देखील कंपनीकडून देण्यात आल्या होत्या. अॅपल-1 च्या ज्या मालकांनी आपले कंप्युटर्स कंपनीला परत केले ते नष्ट करण्यात आले, तर अर्ध्याहून अधिक कंप्युटर्स कंपनीकडे परत आलेच नाहीत.

Leave a Comment