‘मुळशी पॅटर्न’च्या ‘खतरनाक’ने ओलांडला एवढ्या मिलियन व्ह्यूजचा टप्पा


संपूर्ण महाराष्ट्राला प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित, अभिनीत ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाने वेड लावले. विविध पुरस्कार सोहळ्यातही या चित्रपटाला सन्मानित करण्यात आले. तर या चित्रपटातील अबालवृद्धांनी डोक्यावर घेतलेल्या ‘अरारारारा खतरनाक’ या गाण्याने आता आपल्या लोकप्रियतेची घौडदौड कायम राखत २५ मिलियन व्ह्यूजचा टप्पा नुकताच पार केला आहे.

आयटम साँगच्या धर्तीवर बनलेल्या या भाईटम साँगची खासियत म्हणजे यात शहरातील सगळ्यात मोठ्या भाईचा वाढदिवस असतो आणि त्या दिवशीच्या जल्लोषावर आधारलेले हे गाणे असल्यामुळे खास भाई स्टाईल डान्स या गाण्यात पाहायला मिळतो. या गाण्यापूर्वी प्रविण विठ्ठल तरडे हे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सर्वांना परिचित होते, पण त्यांचा डान्स संपूर्ण महाराष्ट्राला या आईटम साँगच्या निमित्ताने पहिल्यांदाच पाहायला मिळाला.

जेव्हा हे गाणे रिलीज झाले तेव्हा पुणे आणि मुळशी पट्ट्यातील अनेक गुन्हेगार या गाण्यात दिसल्याने त्यावर वाद निर्माण झाला होता. तो भाग गाण्यातून काढून टाकण्यास पोलिसांनी तरडेंना सांगितले आणि तो तरडेंनी काढूनही टाकला. पण या वादाचा गाण्याच्या लोकप्रियतेवर तसूभरही परिणाम झाला नाही. हे गाणे उलटउत्तरोत्तर अधिकच लोकप्रिय झाले. उमेश जाधव यांनी या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले असून नरेंद्र भिडे यांनी गाण्याला संगीत दिले आहे तर आदर्श शिंदे यांनी हे अफलातून गाणे गायले आहे. त्याचीच पावती या गाण्याच्या निर्मात्यांना २५ मिलियन व्ह्यूजच्या रुपात मिळाली आहे.

Leave a Comment