राहुल गांधींचे ख्रिश्चन मिशेल हे ‘शकुनी मामा’ आहेत – योगी


बल्लिया – ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील आरोपी ख्रिश्चन मिशेल हा राहुल गांधींचा ‘शकुनी मामा’ असल्याची टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. राहुल गांधी देशात काहीही पेचप्रसंग निर्माण झाला की, इटलीला जातात, असा दावा योगींनी केल्यामुळे तेथेच जाऊन त्यांनी मते मागावीत, असे त्यांनी म्हटले आहे.

प्रियंका गांधींना योगींनी ‘शहजादी’ असे देखील संबोधले आहे. राहुल गांधी आणि त्यांची बहीण देशात काहीही पेचप्रसंग निर्माण झाला की इटलीला जातात. या देशाशी त्यांना काहीच कर्तव्य नसेल, तर इटलीलाच जाऊन त्यांनी मते मागावीत, असे ते म्हणाले. मंगळवारी उत्तर प्रदेश येथे योगींनी पाठोपाठ पाच सभा घेतल्या. लोकांना त्यांनी भाजपला मते देण्याचे आवाहन केले. त्यांनी काँग्रेससह सप आणि बसपवरही हल्ला चढवला.

सप आणि बसप कालपर्यंत एकमेकांशी भांडत होते. बसप कार्यकर्त्यांना सपचे गुंड मारहाण करत होते. बसप अध्यक्ष मायावती आज सप नेत्यांसह एकाच मंचावर येत आहेत. केवळ भाजपलाच याचे श्रेय जाते. एकाच मंचावर या दोघांनी येण्याइतके सुरक्षित वातावरण भाजपने निर्माण केल्याचा दावा योगींनी केला आहे. तसेच, पश्चिम बंगालमध्ये अद्याप सभा घेण्याची परवानगी मिळाली नसली तरी, तेथे जाणार असल्याचेही योगींनी यांनी म्हटले आहे.

इटलीचा ख्रिश्चन मिशेल रहिवासी असून ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर व्यवहाराचा तो ब्रोकर आहे. अशा प्रकारच्या ब्रोकर्सना काँग्रेसने नेहमीच पाठिंबा दिला आहे. इटलीला मागच्या दाराने पळून जाता यावे, यासाठी काँग्रेसने केलेली ही योजना आहे. मात्र, आता मोदीजी आले आहेत. या ‘मामा’ला त्यांनी इटलीतून भारतात आणले. त्यांच्या कुटुंबाशी काँग्रेस नेहमीच प्रामाणिक आहे. देशातील नागरिकांशी नाही. देशातील नागरिकांपेक्षाही ते दहशतवाद्यांशी अधिक प्रामाणिक असल्याचा आरोपही योगींनी यावेळी केले.

Leave a Comment