रितेश देशमुखने खोडून काढला पियुष गोयल यांचा आरोप


मुंबई – दिवगंत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री आणि भाजप नेते पियुष गोयल यांनी केलेल्या टीकेनंतर सोशल मीडियाद्वारे त्यांना रितेश देशमुखने सडेतोड उत्तर दिले आहे. रितेश देशमुखला सिनेसृष्टीत काम मिळावे म्हणून विलासरावांनी एका दिग्दर्शकाची ताज हॉटेलमध्ये भेट घेतली होती. ते त्या दिग्दर्शकाला घेऊन २६/११ च्या हल्ल्यादरम्यान ताजमध्ये गेले होते, अशी टीका पियुष गोयल यांनी केली होती.

जेव्हा मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता तेव्हा काँग्रेसचे सरकार सत्तेत होते. विलासराव देशमुख त्यावेळी मुख्यमंत्री होते. हा हल्ला ज्यावेळी झाला, विलासराव त्यावेळी हॉटेलच्या बाहेर एका दिग्दर्शकाला घेऊन गेले होते. आपल्या मुलाला चित्रपटात काम मिळावे, म्हणून त्यांची धडपड सुरू होती, असे पियुष गोयल यांनी एका कार्यक्रमात म्हटले होते.


आपल्या ट्विटर अकाऊंटवर रितेशने या टीकेचे खंडन केले आहे. ट्विटरवर त्याने एका पत्राद्वारे पियुष गोयल यांना उत्तर दिले आहे. मला काम मिळावे म्हणून माझ्या वडिलांनी कधीच कोणत्याही दिग्दर्शकाची किंवा निर्मात्याची भेट घेतली नाही. याचा मला अभिमानही आहे. तुमच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी जी व्यक्ती जिवंत नाही, त्या व्यक्तीवर आरोप करणे चुकीचे आहे. त्यांनी सात वर्षांपूर्वी याचे उत्तर नक्की दिले असते. अशाप्रकारे रितेशने उत्तर दिले आहे.

Leave a Comment