मोदींच्या त्या मुलाखतीचे संपूर्ण कथानक आधीच होते तयार


मुंबई – एका वृत्तवाहिनीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली मुलाखत सध्या चांगलीच चर्चेत आहे. बालाकोट एअरस्ट्राइकबाबत आणि १९८७-१९८८ च्या सुमारास डिजिटल कॅमेरा आणि ईमेलच्या वापराबाबत या मुलाखतीत केलेल्या वक्तव्यावरुन मोदींवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. पण आधीच या संपूर्ण मुलाखतीचे कथानक तयार होते आणि त्यातील प्रश्न देखील ठरवून विचारण्यात आल्याचे गंभीर आरोप मोदींवर काँग्रेस आणि विरोधकांकडून करण्यात येत आहे. मोदींवर यापूर्वीही अनेकदा मुलाखत आधीच फिक्स करण्याचे आरोप झाले आहेत.

या मुलाखतीच्या काही भागाचा व्हिडिओ काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख दिव्या स्पंदना यांनी ट्विट केला आहे. मोदींच्या मुलाखतीचे प्रश्न आधीच ठरले होते असा आरोप या व्हिडिओद्वारे करण्यात आला आहे. स्पंदना यांनी याशिवाय आता आम्हाला कळले की मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत किंवा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसोबत खुली चर्चा का करत नाहीत, असा टोलाही लगावला आहे.


व्हायरल व्हिडिओत मोदींच्या हातात काही कागद दिसत असून त्यावर हिंदीतून कविता छापलेली दिसत आहे, तसेच सवाल संख्या 27 असेही लिहिलेले दिसत आहे. काही प्रश्न कवितेच्या वरती लिहिलेले दिसत आहेत आणि तेच प्रश्न मुलाखत घेताना विचारण्यात आले होते अशी टीका मोदींवर केली जात आहे. हा व्हिडिओ ट्विट करत दिव्या स्पंदना यांनी लोकांना हा व्हिडिओ पाहताना तिसऱ्या सेकंदाला व्हिडिओ पॉज करण्याचे आवाहन केले आहे. व्हिडिओ पॉज केल्यावर कागदावर लिहिलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरेही दिसत आहेत.

Leave a Comment