शाई लावलेल्या बोटासह सेल्फीमुळे वढेरांची झाली गोची


नवी दिल्ली – रविवारी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांचे पती रॉबर्ट वढेरा यांनी मतदान केल्यानंतर वढेरा यांनी शाई लावलेल्या बोटासह सेल्फी ट्विट केला, पण वढेरा यांची त्या ट्विटमुळे चांगलीच गोची झाली. कारण, त्यांनी ट्विट करताना चुकून भारताऐवजी पॅराग्वेच्या झेंड्याचा इमोजी वापरला.

त्यांनी आपला अधिकार, आपलं सामर्थ्य, या देशाच्या उज्वल भविष्यासाठी आम्हाला सगळ्यांच्या पाठिंब्याची गरज आहे…प्रत्येकाने मतदानासाठी बाहेर पडा…असे मतदानाचे आवाहन करणारे ट्विट केले होते. पण त्यांनी ट्विटच्या अखेरीस इमोजी वापरताना भारताच्या झेंड्याऐवजी चुकून पॅराग्वे या देशाच्या झेंड्याचा वापर केला. ही बाब नेटकऱ्यांच्या आणि भाजप समर्थकांच्या लक्षात येताच वढेरा यांना त्यांनी ट्विटरवर ट्रोल करण्यास सुरूवात केली. वढेरा यांनी आपली चूक लक्षात येताच तातडीने ते ट्विट डीलिट केले, व झालेली चूक मान्य करत नव्याने ट्विट केले पण तोपर्यंत ते ट्रोल झाले होते.

वढेरा यांनी नव्याने केलेल्या ट्विटमध्ये हातात भारताचा झेंडा घेतलेला स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आणि भारत माझ्या मनात आहे, तिरंग्याला माझा सलाम. पॅराग्वेचा झेंडा माझ्या आधीच्या पोस्टमध्ये चुकून वापरण्यात आला…ती एक चूक होती हे तुम्हालाही लक्षात आले, चर्चा करण्यासाठी या देशात अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत पण तरीही तुम्ही माझ्या चुकीवर चर्चा करण्याचे ठरवले याचे दुःख वाटते असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave a Comment