रणवीरच्या ‘८३’ला प्रितम यांचा स्वरसाज


लवकरच ‘८३’ चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता रणवीर सिंह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २५ जून १९८३ ही तारीख भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये कोरली गेली होती. कारण भारतीय संघाने याच दिवशी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर क्रिकेट विश्वकरंडक जिंकला होता. चित्रपटाची कथा याच विजयावर आधारित असणार आहे. सोशल मीडियामध्ये देखील या चित्रपटाची बरीच चर्चा सुरू आहे. या चित्रपटाला बॉलिवूडचे आघाडीचे संगीत दिग्दर्शक प्रितम हे संगीत देणार आहेत.

प्रितम यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करून रणवीरने ही माहिती दिली आहे. रणवीर सिंहच्या चित्रपटाला प्रितम पहिल्यांदाच संगीत देणार आहेत. या चित्रपटात रणवीर कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. तो गेल्या अनेक दिवसांपासून या भूमिकेसाठी मेहनत घेताना दिसत आहे. तो कपिल देव यांच्यासोबत दिल्लीतही १० दिवस राहून प्रशिक्षण घेणार आहे. त्यांचासारखा लूकही त्याने करून घेतला आहे.

‘८३’च्या दिग्दर्शनाची धुरा’चक दे इंडिया’चे दिग्दर्शक कबीर खान यांनीच सांभाळली आहे. उत्तम कथा आणि तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट २०२० मध्ये १० एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणवीर आणि कपिल देव यांचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Leave a Comment