सिद्धू पाजी, हा पाजीपणा थांबवा…


कालपर्यंत भारतीय जनता पक्षाचे नेते असलेले माजी क्रिकेटपटू आणि आता पंजाबमध्ये काँग्रेसचे मंत्री असलेले नवज्योतसिंग सिद्धू यांनी जो पाजीपणा चालवला आहे, तो थांबवला नाही तर काँग्रेस गोत्यात यायला वेळ लागणार नाही. क्रिकेटचे समालोचन करताना चुरचुरीत वाटणारी सिद्धू यांची जीभ आता बिनहाडाची वाटायला लागली आहे. विरोधी पक्षांवर टीका करताना त्यांनी जी एकामागोमाग वक्तव्ये केली आहेत, ती काँग्रेसला महागातच पडण्याची जास्त शक्यता आहे.

तसे भारतीय राजकारणात वाट्टेल ते बोलणाऱ्या नेत्यांची किंचितही उणीव नाही. गेले दोन-तीन महिने असा एकही दिवस गेलेला नाही, की प्रचाराच्या दरम्यान एखाद्या नेत्याने वावदूक वक्तव्य केले नसेल. सिद्धू यांचे नेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना तर त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची माफीही मागावी लागली. मात्र एकाच दिवशी दोन वक्तव्यांबद्दल गोत्यात येऊन सिद्धू यांनी एक नवा विक्रम रचला आहे. भारतीयांना काळे इंग्रज म्हणणे आणि नववधूंची टिंगल करणे, अशा दोन वक्तव्यांद्वारे सिद्धू यांनी स्वतःवर आफत ओढवून घेतली आहे. या दोन्ही वादांना कारण झाले ते इंदूर येथे त्यांनी केलेली वक्तव्ये.

“देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा काँग्रेस हाच पक्ष आहे, हा मौलाना आझाद आणि महात्मा गांधींचा पक्ष आहे. त्याने आपल्याला गोऱ्यांपासून स्वातंत्र्य मिळवून दिले आणि इंदूरवासीहो, तुम्ही ‘काळ्या इंग्रजांना’ या देशातून घालवा,” असे ते म्हणाले. सिद्धू यांच्या या बेतालपणाचा फायदा भाजपने घेतला नसता तरच आश्चर्य होते. म्हणून सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि 130 कोटी भारतीयांना काळे इंग्रज म्हटल्याबद्दल भाजपने कठोर टीका केली. काँग्रेसला सोनिया गांधी, अँडरसन, क्वात्रोच्ची, क्रिश्चेन मिशेल हे सगळे परकीय लोक भारतीय वाटतात परंतु मोदी मात्र काळे इंग्रज वाटतात, हा कुठला न्याय आहे असा सवाल भाजपचे प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी केला. त्याला उत्तर देणे काँग्रेसच्या दृष्टीने कधीही सोपे नसेल.

दुसरीकडे सिद्धू यांना राष्ट्रीय महिला आयोगानेही त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत . मोदीजी हे नववधूसारखे आहेत. भाकरी करताना नववधू बांगड्या जास्त वाजवते आणि भाकऱ्या कमी करते जेणेकरून गल्लीतल्या लोकांना कळावे, की ती काम करत आहे. मोदीजी हेच करत आहेत,” असे ते म्हणाले. त्याबद्दल आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी सिद्धूंवर टीका करतानाच त्यांची महिलाविरोधी मानसिकता दिसून येते, असे त्यांनी म्हटले आहे. महिला या केवळ भाकऱ्या करण्याच्या आणि बांगड्या वाजविण्याच्या कामासाठीच आहेत का, असा सवाल त्यांनी केला आहे.

सिद्धू यांची ही वक्तव्ये ऐन दिल्ली व पंजाबमधील मतदानाच्या आधी आलेली आहेत. देशात सातत्याने काँग्रेसची पीछेहाट होत असताना त्या राज्यात काँग्रेसला थारा मिळाला. त्यामागे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांचा सिंहाचा वाटा आहे. पंजाबमध्ये काँग्रेसचा विजय झाला तेव्हा माध्यमांनी काँग्रेसचा नव्हे तर अमरिंदर यांचा विजय झाल्याचे म्हटले होते. आजपर्यंत अमरिंदर यांनी एकही वावगे वक्तव्य केले नाही आणि राज्याला सक्षम नेतृत्व दिले आहे. किमान त्या अमरिंदर यांचा तरी आदर्श सिद्धू यांनी घ्यावा. उलट सिद्धू त्यांना आपले नेते मानायलाच तयार नाहीत.

अमरिंदर यांनी त्यांना पाकिस्तानला जाऊ नये, असे सुनावले होते. मात्र त्यांचे न ऐकता पाकिस्तानला गेले आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह पाकिस्तानी सेनाप्रमुख जनरल बाजवांच्या मांडीला मांडी लावून आले. त्यानंतर कर्तारपूरला गेले आणि तेथील राज्यकर्त्यांची स्तुती करून आले. इतकेच नव्हे तर गेल्या महिन्यात निवडणूक प्रचार करताना मुस्लिम समुदायासमोर त्यांनी केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले होते. मुस्लिम मतदारांनी मोदींविरोधात एकजुटीने मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यावरही अमरिंदर यांनी त्यांच्याशी मतभेद व्यक्त केले होते. “आपला देश एक आहे आणि देशात अनेक जाती व धर्म आहेत. ते सर्व भारतीय आहेत, हीच काँग्रेसची भूमिका आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले होते.

सिद्धूसारख्या नाठाळांनी वावदूक वक्तव्ये करायची आणि अमरिंदर यांच्यासारख्या समंजस व्यक्तींनी त्यावर सफाई द्यायची, हा खेळ काँग्रेस किती काळ करत राहणार आहे? कोणीतरी सिद्धूंना सांगायला पाहिजे, की सिद्धू पाजी, हा पाजीपणा थांबवा…!

Leave a Comment