गुगलवर ‘या’ दोन गोष्टी सर्वाधिक सर्च केल्या जातात


नवी दिल्ली : सोशल मीडियाचा सध्याच्या घडीला जगभरात सर्रास वापर केला जातो. गुगल या सर्च इंजिनचा वापर लोक कोणतीही गोष्ट सर्च करण्यासाठी करतात. दरम्यान भारतीयांनी 2018 मध्ये गुगलवर कोणत्या गोष्टी सर्च केल्या याबाबतच अहवाल नुकताच गुगलने प्रसिद्ध केला असून या अहवालात नोंदीनुसार, डेटिंग आणि लग्न या दोन गोष्टी भारतीय लोक सर्वाधिक सर्च करतात असे स्पष्ट झाले आहे.

अनेक डेटिंग साईट्स सध्या जगभरात उपलब्ध झाल्या आहेत. पार्टनर शोधण्यासाठी अनेकदा या डेटिंग साईटचा वापर केला जातो. यानुसार गुगलद्वारे डेटिंग साईटचा वापर करणाऱ्यांच्या संख्येत 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर लग्न जुळवणाऱ्या मेट्रोमेनियल साईट्स सर्च करणाऱ्यांच्या संख्येत केवळ 13 टक्के वाढ झाली आहे. गुगलने दिलेल्या या अहवालावरुन विवाहबंधनात अडकण्यापेक्षा डेटिंगवर जाणे भारतील लोक जास्त पसंत करत असल्याचे स्पष्ट होत आहे.

डेटिंगनंतर सर्वाधिक सर्च केलेल्या शब्दामध्ये गिफ्टस आणि रोमॅंटिक डिनर या दोन शब्दांचा समावेश आहे. 24 टक्के भारतीयांनी गुगलवर प्रेम कसे व्यक्त करावे हे सर्च केले आहे. त्यानंतर 21 टक्के भारतीयांनी रोमँटिंक डिनर हा शब्द सर्च केला आहे. तर तब्बल 34 टक्के भारतीय लोकांनी पार्टनरला कोणते गिफ्ट द्यावेत हे सर्च केले आहे. त्याचबरोबर भारतीयांनी गुगलवर ब्यूटी टिप्स, डेटिंग, हॉबी, यांसह विविध गोष्टीही सर्च केल्या आहेत.

भारतात दिवसेंदिवस इंटरनेटचा वापर वाढत आहे. जगातील सर्वाधिक इंटरनेट वापरणारा देश म्हणून सध्या भारताची ओळख निर्माण झाली आहे. त्याशिवाय हिंदीमध्ये सर्च करणाऱ्या लोकांची संख्याही गुगलवर दिवसेंदिवस वाढत आहे. लॅपटॉप, मोबाईल फोन याद्वारे हिंदीत सर्च करणाऱ्या लोकांची संख्या गेल्यावर्षात दुप्पट झाली आहे. अशी माहिती गुगलचे राष्ट्रीय निदेशक विकास अग्निहोत्री यांनी दिली आहे. भारतीय गुगलवर जवळचे चित्रपटागृह, कॉफी शॉप, हॉटेल, एटीएम यांसारख्या इतर आवश्यक गोष्टीही शोधत असतात. यात सर्वाधिक सर्च इन्शुरन्स कंपनी, ब्यूटी पार्लर आणि टूर्स आणि ट्रॅव्हल्स याबाबत सर्च केल आहे.

Leave a Comment