
नवी दिल्ली – माजी बीएसएफ कॉन्स्टेबल तेजबहादूर यादव यांची वाराणसी लोकसभा मतदार संघातून उमेदवारीची सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली. आम्हाला सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पीठाने या याचिकेचा विचार करावा असे कोणतेही सबळ कारण दिसत नसल्याचे सांगितले. यादव यांची उमेदवारी १ मे रोजी निवडणूक आयोगाकडून रद्द करण्यात आली होती.
तेजबहादूर यादव यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
शासकीय सेवेतून भ्रष्टाचार किंवा शासनाशी अप्रामाणिकपणे वागल्याने कमी करण्यात आलेले नाही, अशा आशयाचे प्रमाणपत्र तेजबहादूर यादव यांना सादर करणे आवश्यक होते. यादव यांचा उमेदवारी अर्ज ते सादर न करू शकल्याने रद्द करण्यात आला. आपल्या अशिलाला बीएसएफमध्ये असताना जेवणाबद्दल तक्रार केल्यामुळे त्रास देण्यात आला, असे त्यांचे वकील प्रशांत भूषण यांनी म्हटले होते.
वाराणसी मतदार संघातून पंतप्रधान मोदींविरोधात समाजवादी पक्षाने २९ एप्रिलला यादव यांना उमेदवारी दिली होती. ते त्याआधी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार होते. नरेंद्र मोदी २०१४ मध्ये वाराणसीतून ३.३७ लाखांच्या मताधिक्याने आपचे अरविंद केजरीवाल यांना हरवून जिंकून आले होते. वाराणसीत १९ मे रोजी शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे. २३ मे रोजी मतमोजणी होईल.
