गंभीरसाठी व्हीव्हीएस लक्ष्मण आणि हरभजनची बॅटिंग


नवी दिल्ली: आम आदमी पक्षाच्या पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आतिशी मार्लेना यांच्याबद्दलचा आक्षेपार्ह मजकूर असलेली पत्रके वाटल्यावरुन मोठा वाद निर्माण झाला असून आपच्या उमेदवार आतिशी यांनी या प्रकरणी दिल्ली महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. गौतम गंभीरविरोधात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना गौतम गंभीरचे दोन माजी सहकारी त्याच्या मदतीसाठी धावले आहेत. भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू हरभजन सिंह आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी गंभीरसाठी बॅटिंग केली आहे.

महिलांविरोधात गौतम गंभीर कधीही चुकीचे बोलणार नाही, असा विश्वास हरभजन सिंगने व्यक्त केला. गौतम गंभीरशी मी काल संबंधित एक प्रकरण ऐकले. मला ते ऐकून धक्काच बसला. त्याला मी खूप चांगला ओळखतो. महिलांविरोधात तो कधीही चुकीचे बोलणार नाही. तो निवडणुकीत जिंको अथवा पराभूत होवो, माणूस म्हणून तो खूप चांगला असल्याचे ट्विट करुन हरभजनने गंभीरची बाजू घेतली आहे.

गौतम गंभीरवरील आरोपांवर विश्वास बसत नसल्याचे माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मणनेदेखील ट्विट करुन म्हटले आहे. मी काल ऐकलेल्या गोष्टी ऐकून स्तब्धच झालो. मी 2 दशकांपासून गौतमला ओळखतो. महिलांबद्दल त्याच्या मनात आदर आहे. मी त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल खात्री देऊ शकतो, असे लक्ष्मणने ट्विटमध्ये म्हटले आहे.

आपच्या आतिशी मार्लेना आणि भाजपचे गौतम गंभीर अशी पूर्व दिल्ली मतदारसंघात लढत आहे. आतिशी यांच्याबद्दल मतदासंघातील काही ठिकाणी आक्षेपार्ह मजकूर असलेली पत्रके वाटण्यात आली. भाजप आणि गौतम गंभीर यामागे असल्याचा आरोप मार्लेना यांनी केला. गंभीर एखाद्या सशक्त महिलेविरोधात अशा प्रकारची पत्रके वाटू शकतात. तर ते महिलांना काय सुरक्षा देणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Leave a Comment