
तब्बल २५ वर्षांनंतर मराठी चित्रपटात बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन काम करणार आहेत. बिग बी मिलिंद लेले दिग्दर्शित ‘ए बी आणि सी डी’ या मराठी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर येत आहे. विक्रम गोखलेंसोबत या चित्रपटात त्यांची महत्वाची दृश्ये आहेत. हेमंत ऐदलाबादकर यांचे या चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद आहे.
तब्बल २५ वर्षांनंतर मराठी चित्रपटात काम करणार महानायक
मुंबईत या चित्रपटाच्या शूटिंगला येत्या २० मेपासून सुरुवात होणार आहे. या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण मुंबई आणि पुणे येथे होईल. या चित्रपटात दोन गाणीही आहेत. बिग बींनी यापूर्वी दीपक सावंत यांनी निर्मिलेल्या आणि श्रीधर जोशी दिग्दर्शित आक्का (१९९४) या मराठी चित्रपटात जया बच्चन यांच्यासोबत ‘तू जगती अधिपती’ या गणपती आरती गीतात भूमिका साकारल्यानंतर ते तब्बल पंचवीस वर्षांनी मराठी चित्रपटाच्या पडद्यावर दिसतील. तर बिग बींच्या ‘एबीसीएल’ या कंपनीच्या वतीने उमेश विनायक कुलकर्णी दिग्दर्शित विहीर ( २००९) या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती.
