प्रिन्स हॅरी आणि मेघन मार्कलच्या अपत्याचे नाव घोषित


ब्रिटीश राजघराण्याचे राजकुमार प्रिन्स हॅरी आणि त्याची पत्नी मेघन मार्कल यांच्या होणाऱ्या अपत्याबद्दल संपूर्ण ब्रिटनलाच नव्हे तर जगालाच उत्कंठा होती. हे अपत्य मेघन आणि हॅरीचे पहिलेच अपत्य असल्याने याबद्दल सर्वांनाच उत्कंठा लागून राहणे साहजिकच होते. त्याचबरोबर हे अपत्य मुलगा असणार की मुलगी याबद्दलही निरनिरळ्या लोकांच्या, मिडीयाच्या, या दाम्पत्याच्या मित्रपरिवाराच्या अनेक अटकळी होत्या. अखेर सहा मे रोजी या लहानशा पाहुण्याच्या आगमनाचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. मेघन आणि हॅरीच्या घरी छोट्या राजकुमाराचे आगमन झाले असून, सहा मे रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास मेघनची प्रसूती झाली असल्याचे शाही परिवाराच्या तर्फे केल्या गेलेल्या औपचारिक घोषणेमध्ये सांगण्यात आले.

मुलगा होणार ही मुलगी या अटकळी संपुष्टात आल्यानंतर या तान्ह्या पाहुण्याचे नाव काय ठेवण्यात येईल यावर अंदाज वर्तविले जाऊ लागले. अखेर दोन दिवसांनी आपल्या तान्ह्या राजपुत्राला घेऊन राणी एलिझाबेथच्या भेटीला आलेल्या हॅरी आणि मेघनने आपल्या अपत्याच्या नावाची औचारिक घोषणा केली. मेघन आणि हॅरीने आपल्या मुलाचे नाव ‘आर्ची’ ठेवले असून याचे संपूर्ण नाव ‘आर्ची हॅरिसन माउंटबॅटन विंडसर’ असे असणार आहे. आर्ची ब्रिटीश सिंहासनाच्या उत्तराधिकाऱ्यांच्या यादीमध्ये सातव्या क्रमांकावर आहे. त्याच्या आधी प्रिन्स चार्ल्स, त्यांचा थोरला मुलगा प्रिन्स विलियम, त्याची तीनही अपत्ये, त्यानंतर प्रिन्स हॅरी आणि मग आर्ची अशी ही यादी आहे.

आर्ची, राणी एलिझाबेथ आणि त्यांचे पती प्रिन्स फिलीप यांचा पणतू असून, राणी एलिझाबेथ आणि प्रिन्स फिलीप यांना भेटल्यानंतर मेघन आणि हॅरीने आपल्या मुलाच्या नावाची घोषणा केली. ही घोषणा मेघन आणि हॅरीच्या औपचारिक इन्स्टाग्राम अकाऊंटवरही करण्यात आली आहे. या घोषणेसोबत राणी एलिझाबेथ आणि प्रिन्स फिलीप यांच्या भेटीला आलेल्या आर्चीची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. मेघन आणि हॅरीसमवेत मेघनच्या आई डोरीया रॅग्लंडही राणी एलिझाबेथ यांच्या भेटीसाठी आल्या होत्या.

Leave a Comment