संगीताच्या बादशाहाचा जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर


कलाविश्वात अतिशय महत्त्वपूर्ण असे योगदान भारतीय चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी दिले आहे. ज्यामध्ये आपले वेगळेपण जपत प्रत्येक कलाकाराने कलेची साधना केली. पंचमदा अर्थात राहुल देव बर्मन हे अशाच कलाकारांच्या यादीतील एक नाव आहे. आपल्या संगीताचा नवा प्रयोग ते नेहमी सादर करत आणि त्यांचे हे प्रयोग लोकांना देखील आवडत असत. आता तुमच्या भेटीला संगीताचा बादशाह आर.डी.बर्मन यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक येणार आहे.

दिवंगत संगीतकार आर.डी.बर्मन यांच्या जीवनावर आधारित बायोपिक करण्याचा निर्णय बंगाली चित्रपटांचे सुपरस्टार प्रसेनजीत चॅटर्जी यांनी घेतला असून या चित्रपटाचे हक्क प्रसेनजीत चॅटर्जी यांनी आकाश गुप्ता आणि अरुणवा जॉय सेनगुप्ता यांच्यासह विकत घेतले आहेत. आर.डी.बर्मन चरित्र २०१५मध्ये प्रकाशित झाले होते. तसेच या चरित्राचे नाव ‘आर.डी.बर्मन: प्रिन्स ऑफ म्यूझिक’ असे आहे.

‘आर.डी.बर्मन’ यांच्या बायोपिकचे हक्क विकत घेतले असले तरी चित्रपटात कोण काम करणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. तसेच हा चित्रपट बंगाली भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्या भाषेत प्रदर्शित केला जाणार याचा देखील खुलासा करण्यात आलेला नाही. चित्रपटात आर.डी.बर्मन यांची पत्नी आशा भोसले यांची भूमिका असणार की नाही? भोसले परिवार या बायोपिकमध्ये कोणती भूमिका साकारणार असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.

Leave a Comment