अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शिकवण


अकोला जिल्ह्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एकंदर कामकाजाबद्दल नागरिकांमध्ये नेहमीच नाराजीचा सूर असतो. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी कानी आल्यानंतर अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असितकुमार पांडे यांनी जेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला अचानक भेट देण्याचे ठरविले तेव्हा येथील वातावरण पाहून या विभागावर जनतेचा रोष का असावा हे त्यांच्या लक्षात येण्यास वेळ लागला नाही. वास्तविक या विभागाच्या कार्यालयाला भेट देऊन येथील कामकाज समजून घेण्याच्या आणि आवश्यक असल्यास काही बदल सुचविण्याच्या उद्देशाने येथे आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना विभागाच्या इमारतीमध्ये प्रवेश केल्या-केल्याच असे काही दृश्य दिसले, की या विभागातील एकंदर कारभार कसा चालविला जात असावा, याची कल्पना त्यांना आली.

या इमारतीमध्ये सगळीकडे घाणीचा बाजार होता. इमारतीतील सर्वच भिंतींवर पान, गुटखा थुंकलेल्या डागांचे चित्रकाम होते. आपल्या कामाची जागा, आपले कार्यालय जर कर्मचारी स्वच्छ ठेऊ शकत नसतील, तर या ठिकाणी बसून ते कामही व्यवस्थित करू शकणार नाहीत असे स्पष्ट मत असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये स्वतः जातीने लक्ष घालण्याचे ठरविले, आणि कोणाला काही समजायच्या आत, जिल्हाधिकाऱ्यांनी एक पाण्याने भरलेली बादली आणि कपडा मागवून स्वतःच हे डाग धुवून काढण्यास सुरुवात केली.

जिल्हाधिकारी असे काही करतील याची कल्पनाही न करू शकलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये, स्वतः जिल्हाधिकारी भिंतींवरील पानांच्या पिचकाऱ्यांचे डाग पुसून काढताना पाहून चांगलीच धांदल उडाली. आपले कार्यालय स्वच्छ ठेवण्याचे साधे कामही आपण करू शकलो नसल्याच्या भावनेने सर्वांचीच मान लाजेने खाली गेली. एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अखेर काही महिला कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भिंती पुसणे थांबवण्याची वारंवार विनंती केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची विनंती मान्य केली. त्यानंतर अर्थातच जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली, आणि पुढील दोन दिवसांमध्ये कार्यालय आरशासारखे लख्ख केले जाण्याबद्दल ताकीदही दिली. एखादा बदल घडवून आणायचा असेल, तर त्याची सुरुवात स्वतः करण्याने इतरांना ही त्यातून प्रेरणा मिळते हे विधान जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या वर्तनातून सर्वथा सार्थ ठरविले.

Leave a Comment