ड्रायव्हिंग लायसन्ससाठीचे नियम केंद्र सरकारने केले आणखी सोपे


नवी दिल्लीः ड्रायव्हिंग लायसन्स तयार करण्याचे नियम केंद्र सरकारने आणखी सोपे केले असून येत्या 1 ऑक्टोबर 2019नंतर ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) पूर्ण देशात एकसारखेच होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक राज्यात आता ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी बुकचा रंग एकसारखाच असणार आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात नोटिफिकेशन जारी केले आहे.

दररोज 32 हजार ड्रायव्हिंग लायसन्स देशभरात दिले जातात किंवा त्यांचे नूतनीकरण करण्यात येते. त्याचप्रकारे दररोज जवळपास 43 हजार गाड्यांची नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली जाते. फक्त 15 ते 20 रुपयांचा खर्च या नव्या ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आरसीसाठी येणार आहे. याबाबत केंद्रीय वाहतूक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, या बदललेल्या नियमामुळे ट्रॅफिकच्या कामातूनही आम्हाला वेळ मिळणार आहे.

ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसीसंदर्भात या निर्णयामुळे कोणतीही संभ्रमाची परिस्थिती निर्माण होणार नाही. स्वतःच्या सुविधेनुसार प्रत्येक राज्य ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसीचा नमुना तयार करतो. त्यामुळे काही राज्य याची माहिती ड्रायव्हिंग लायसन्सच्या मुखपृष्ठावर देतात, तर काही जण मागच्या बाजूला माहिती देतात. परंतु सर्वच राज्यांमध्ये आता नव्या नियमानुसार ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आरसी तयार होणार आहे.

मायक्रोचिप आणि क्यूआर कोड या स्मार्ट ड्रायव्हिंग लायसन्स ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसीमध्ये राहणार असल्यामुळे कोणत्याही नियमांचे आपण उल्लंघन केल्यास ते लपून राहणार नाही. ट्रॅफिक पोलिसांनी त्यांच्याकडे असलेल्या डिव्हाइसमध्ये कार्ड टाकल्यानंतर क्यूआर कोड स्कॅन केल्यास गाडी आणि चालकासंदर्भातील सर्व माहिती मिळणार आहे. या नोटिफिकेशननुसार सर्वच राज्यात 1 ऑक्टोबरपासून ड्रायव्हिंग लायसन्स आणि गाड्यांचं नोंदणी प्रमाणपत्र पीवीसीवर आधारित होणार आहे.

Leave a Comment