
लवकरच अभिनेता अर्जुन रामपाल घटस्फोट घेणार आहे. अर्जुनची प्रेयसी त्याआधीच गरोदर आहे. पण ‘नवऱ्याच्या बायको’चे डोहाळे अर्जुनची ‘दुरावलेली पत्नी’ मेहर जेसिया पुरवणार आहे. दशकभराच्या संसारानंतर हृतिक रोशन-सुजान खान, अरबाज खान-मलायका अरोरा ही विभक्त झालेली नजीकच्या काळातील काही जोडपी असून नात्यात आलेल्या दुराव्यानंतरही त्यांनी मैत्र जपले आहेत. अशा ‘आदर्श विभक्त जोडप्यां’च्या यादीत अर्जुन रामपाल-मेहर जेसिया यांच्या रुपाने भरच पडताना दिसत आहे.
‘नवऱ्याच्या बायको’चे डोहाळे पुरवणार विभक्त पत्नी मेहर
1998 मध्ये अर्जुन आणि मेहर विवाहबंधनात अडकले होते. वीस वर्षांच्या संसारानंतर गेल्या वर्षी मे महिन्यात दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. महिका आणि मायरा या दोन मुली दोघांना आहेत. कायदेशीदृष्ट्या अर्जुन-मेहर विभक्त झालेले नसले, तरी लवकरच त्यांचा घटस्फोट होणार आहे.
नुकतीच आपल्या नात्याची अर्जुन रामपाल आणि दक्षिण आफ्रिकन सुपरमॉडेल आणि अभिनेत्री गॅब्रिएला डिमेट्रिअॅड्स यांनी जाहीर कबुली दिली होती. ते बऱ्याच काळापासून लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. ‘सोनाली केबल’ या चित्रपटात गॅब्रिएला दिसली होती. अशातच अर्जुनच्या प्रेयसीने गुड न्यूज दिली आहे. मेहरने गॅब्रिएला गरोदर असल्याची गोष्ट फारच स्पोर्टिंगली घेतलेली दिसते. विशेष म्हणजे लवकरच गॅब्रिएलाचे बेबी शॉवर अर्थात डोहाळ जेवण होणार असून त्याची तयारी मेहरने सुरु केली आहे.
