फानी चक्रीवादळातील पीडितांसाठी अक्षय कुमारने केली 1 कोटींची मदत


गेल्या काही दिवसांपासून नागरिकत्वाच्या विवादामुळे बातम्यांमध्ये असलेला बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आपल्या एका सामाजिक कार्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अक्षय कुमारने फानी चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या ओडिशातील पीडितांना एक कोटी रुपयांची मदत केली आहे. या संदर्भातील वृत्त ‘हिदुस्तान टाइम्स’ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, ओडिशामध्ये आलेल्या फानी चक्रीवादळाचा फटका बसलेल्या नागरिकांसाठी अक्षय कुमारने मदतीचा हात पुढे केला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी त्याने 1 कोटी रुपयांची मदत केली आहे.

‘हिदुस्तान टाइम्स’ला ही माहिती बॉलिवूडमधील विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. याबाबत वृत्तपत्राने ओडिशातील मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पण यावर अद्यापपर्यंत कोणतेही उत्तर मिळालेले नाही. दरम्यान, यापूर्वीही अशी अनेक सामाजिक कार्य अक्षय कुमारने केली आहेत. केरळ आणि चेन्नईमधील पूरग्रस्त पीडितांनाही आर्थिक मदत केली आहे. अक्षयने तेव्हादेखील एक कोटी रुपयांची मदत केली होती. पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांनाही अक्षयने मदतीचा हात दिला होता.