सत्संगादरम्यान महिलांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी आनंद गिरी महाराजांना अटक


सिडनी : ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे प्रयागराजमधील प्रसिद्ध हनुमान मंदिराचे छोटे महंत योगगुरु आनंद गिरी महाराजांना अटक करण्यात आली आहे. आनंद गिरी महाराजांना महिलांशी गैरवर्तन आणि मारहाण प्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सिडनीतील दोन महिलांनी सत्संग कार्यक्रमादरम्यान गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांच्यावर केला. ऑस्ट्रेलियातील माध्यमांच्या माहितीनुसार, हे प्रकरण 2016 सालापासून प्रलंबित होते.

गेल्या काही दिवसांपासून योगगुरु आनंद गिरी महाराज ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. ते तिथे योग आणि सत्संगाचे कार्यक्रम घेत आहेत. सोमवारी ते भारतात परतणार होते. पण रविवारीच दुपारी साडेबारा वाजता आनंद गिरी महाराजांना सिडनी पोलिसांनी अटक केली.

आनंद गिरी महाराजांनी 2016 साली सत्संगदरम्यान 29 वर्षीय महिलेशी गैरवर्तन केले आणि मारहाणही केल्यानंतर नोव्हेंबर 2018 मध्ये आणखी एक असेच प्रकरण समोर आले. 34 वर्षीय महिलेने आनंद गिरी महाराजांनी मारहाण केल्याचा आरोप केला. आनंद गिरी महाराज या दोन्ही प्रकरणात आरोपी होते. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.

आनंद गिरी महाराज प्रयागराजमधील प्रसिद्ध हनुमान मंदिराचे छोटे महंत आणि निरंजन आखाड्याचे पदाधिकारी आहेत. हनुमान मंदिराचे मोठे महंत आणि आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराज यांनी आनंद गिरी महाराजांच्या पाठीशी राहण्याचा प्रयत्न केला. नरेंद्र गिरी महाराज म्हणाले, आपली संस्कृती आहे की, शिष्य ज्यावेळी पाया पडतात, त्यावेळी पाठ थोपटली जाते. येथेही तेच झाले. पण याला महिलेने विरोध केल्यामुळे आनंद गिरी महाराजांचे शिष्य आणि महिलेमध्ये बाचाबाची झाली. त्यातून मारहाणीची तक्रार दाखल करण्यात आली. आनंद गिरी महाराज बुधवारी जामिनासाठी न्यायालयात जातील.

Leave a Comment