
मुस्लीम समाजाचा पवित्र रमजान महिना आता सुरु झाला असून या महिन्यात रोजे पाळण्याची प्रथा आहे. जगभरात जेथे मुस्लीम आहेत तेथे या काळात रोजे पाळले जातील आणि अल्लाची प्रार्थना केली जाईल. मुस्लीम समाजाचे प्रार्थना स्थळ म्हणजे मशीद. जगात अनेक मशिदी आहेत मात्र त्यातील पवित्र मशिदीत मोठ्या मक्का आणि मदिना या मानल्या जातात. जगातील सर्वात मोठी मशीद अबुधाबी मध्ये असून शेख जायद ग्रँड मशीद म्हणून ती प्रसिध्द आहे. जगभरातील मुस्लीम येथे नमाज अदा करण्यासाठी येतात.
अबुधाबी मध्ये आहे जगातील मोठी मशीद

मुस्लिमांसाठी हे पवित्र स्थळ आहेच पण जगभरातील पर्यटकांसाठी सुद्धा या मशिदीची ख्याती सुंदर वास्तू अशीच आहे. पांढऱ्याशुभ्र संगमरावरत अतिशय सुबक कारागिरी करून ही मशीद उभारली गेली आहे. येथे एकावेळी ४० हजार लोक नमाज अदा करू शकतात. ही मशीद पूर्णपणे वातानुकुलीत आहे. येथील सर्वात मोठ्या हॉलमध्ये एकावेळी ७ हजार लोक बसू शकतात.

संयुक्त अरब अमिरातीचे माजी राजे शेख जायद बिन सुलतान अल नाह्यान यांनी या मशिदीची उभारणी १९९६ साली सुरु केली आणि तिचे बांधकाम पूर्ण होण्यास १२ वर्षे लागली. १२ एकर परिसरात असलेल्या या मशिदीचा उद्देश जगभरातील इस्लामिक मान्यता, रिती रिवाज आणि कलाकार एकाच स्थानी असावेत असा आहे.

या मशिदीसाठी राजस्थानातून, कोटा मधून मकराना संगमरवर आणले गेले आणि सोने, मौल्यवान खडे, क्रिस्टल, चीनी मातीचा उपयोग करून तिची सजावट केली गेली आहे. त्यासाठी भारत, मलेशिया, न्यूझीलंड, ग्रीस, ब्रिटन, मोरोक्को, तुर्कस्थान, चीन आणि इराण येथून कारागीर आले होते. या मशिदीच्या घुमटाची उंची ७५ मीटर असून रुंदी ३२.२ मीटर आहे. मशीद पाहण्यासाठी कोणतेही तिकीट नाही. सकाळी लवकर किंवा सूर्यास्ताच्या वेळेस गेल्यास सूर्यकिरणे पडून या इमारतीवर निराळीच आभा पसरल्याचे पाहता येते.
