हा पराठा करा फस्त आणि मिळवा एक लाख रुपये !


गरमागरम पराठे, त्यासोबत झणझणीत लोणचे आणि थंडगार दही कोणाला आवडत नाही? पराठ्यांच्या तऱ्हा तरी किती ! बटाटे, फ्लॉवर, मिश्र भाज्या, मुळे, गाजरे, मेथी, पालक, अगदी आईस्क्रीम आणि रबडीचे देखील चविष्ट पराठे आजकाल लोकप्रिय होत आहेत. एके काळी अस्सल पंजाबी असणारा हा पदार्थ आजच्या काळामध्ये घराघरांत लोकप्रिय आहे. राजधानी नवी दिल्लीतील सुप्रसिद्ध ‘चांदनी चौक’ मधील आख्खी गल्लीच या पदार्थाला समर्पित असून, ‘परांठेवाली गली’ या नावाने लोकप्रिय आहे. अशा या चविष्ट पराठ्यांचा आस्वाद तर तुम्ही नेहमीच घेत असाल, पण हरियाणा राज्यातील सोनीपत जिल्ह्यामध्ये मुरथल गावामध्ये असलेल्या रॉयल मुरथल ढाब्यावर मिळणारा पराठा मात्र काही औरच आहे. या ढाब्यावर बनविला जाणारा मुरथल पराठा अतिशय लोकप्रिय असून, हा ‘किंग पराठा’ चाखण्यासाठी लोक आवर्जून या ढाब्याला भेट देत असतात.

मुरथल ढाब्यावर बनविल्या जाणऱ्या या खास पराठ्याचे वजन तब्बल दोन किलो असून, हा पराठा संपूर्ण देशातील सर्वात भलादांडगा पराठा असल्याचे या ढाब्याच्या मालकाचे म्हणणे आहे. इतकेच नाही, तर हा अवाढव्य पराठा एका बैठकीत संपविणाऱ्या व्यक्तीसाठी या ढाब्याच्या वतीने खास बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. ढाब्याच्या मालकाच्या म्हणण्यानुसार जो कोणी हा आख्खा पराठा पंधरा मिनिटांमध्ये खाऊन फस्त करेल, त्याला एक लाख रुपये रोख आणि आयुष्यभरासाठी मुरथल ढाब्यावर मोफत जेवण , बक्षीस म्हणून देण्यात येईल.

आजवर अनेकांनी हा पराठा एका बैठकीमध्ये संपविण्याचा प्रयत्न केला खरा, पण एक संपूर्ण परिवार पोटभर जेऊ शकेल इतका मोठा हा पराठा असल्याने एका व्यक्तीने केवळ पंधरा मिनिटांमध्ये हा पराठा संपविण्याचा चमत्कार आजवर तरी घडलेला नाही. असा हा एक ‘मुरथल किंग पराठा’ बनविण्यासाठी दोन किलो गव्हाचे पीठ, आणि अर्धा किलो कांदे बटाटे वापरले जातात. हा पराठा साजूक तुपावर भाजला जात असून, हा पराठा तब्बल चोवीस इंच व्यासाचा असतो.

Leave a Comment