प्रियंका गांधी आता सातत्याने करीत आहेत माझ्या नावाचा जप – स्मृती इराणी


नवी दिल्ली – गेल्या पाच वर्षात माझे नाव प्रियंका गांधी वढेरा यांना माहिती नव्हते. पण ते सातत्याने आता माझ्या नावाचा जप करीत असल्याचे म्हणत अमेठीतील भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी प्रियंका गांधींना टोला लगावला आहे.

इराणी पुढे म्हणाल्या, कि माझे नाव गेल्या पाच वर्षात माहिती नसलेल्या प्रियंका गांधी आता माझे नाव सातत्याने उच्चारत आहेत. त्या सध्या आपल्या पतीचे नाव कमी आणि माझेच नाव जास्त उच्चारत आहेत. यावरुन अमेठीतला माझा प्रचार यशस्वी झाला असल्याचीच ही पावती आहे.

दरम्यान, इराणींनी अमेठीतील एका घटनेचा दाखला देताना गांधी कुटुंबावर कठोर शब्दांत टीका केली. त्या म्हणाल्या, राहुल गांधी ट्रस्टी असलेल्या अमेठीतील रुग्णालयात एका रुग्णाचा उपचारांअभावी मृत्यू झाला. आयुष्यमान भारतचे कार्ड या रुग्णाकडे असल्याने त्याला उपचार नाकारण्यात आल्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असा दावा यावेळी त्यांनी केला. गांधी कुटुंब किती वाईट आहे, हे यावरुन लक्षात येते. केवळ राजकारण त्यांना प्रिय असल्याने एका निर्दोष व्यक्तीला त्यांनी मृत्यूच्या दाढेत ढकलून दिले, असा खळबळजनक आरोपही यावेळी स्मृती इराणी यांनी केला.

Leave a Comment