आता इन्श्युरन्स पॉलिसीची देखील करता येणार पोर्टेबिलिटी


नवी दिल्ली : आपण अनेकदा नेटवर्कमध्ये येणारे अडथळे, त्याचबरोबर मोबाईल कंपनीने दिलेल्या ऑफरनुसार आपल्या सुविधा मिळाल्या नाहीतर आपण मोबाईल सिम कार्ड पोर्ट करतो. त्याचप्रमाणे इन्श्युरन्स पॉलिसीची देखील (विमा) आता पोर्टेबिलिटी करता येणार आहे.

सर्वच कंपन्या गेल्या काही वर्षात आपल्या ग्राहकांकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रीत करत आहेत. त्यांच्या ग्राहकांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक कंपनी धडपड करत आहेत. मग ती मोबाईल ऑपरेटर कंपनी असो, डीटीएच कंपनी असो अथवा विमा कंपनी असो. तुम्हाला कंपनीने दिलेल्या सुविधा जर आवडत नसतील तर त्याच कंपन्यांची सेवा आयुष्यभर घेण्याची गरज नाही. आता ग्राहकांसाठी पोर्टेबिलिटीचा पर्याय उपलब्ध आहे.

सध्या वापरत असलेल्या कंपनीच्या सेवा आणि पॉलिसी फीचर्सने विमा ग्राहक समाधानी नसतील, तर हेल्थ पॉलिसी अन्य कोणत्याही कंपनीमध्ये ते ग्राहकांना पोर्ट करता येऊ शकते. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) 2011 साली हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी पोर्ट करण्याची परवानगी दिली होती. पण लोकांना त्याबद्दलची प्रक्रिया माहीत नसल्यामुळे या सेवेचा लाभ घेता आला नाही.

आपली इन्श्युरन्स पॉलिसी कोणत्याही ग्राहकाला पोर्ट करायची असेल, तर त्याच्या मूळ पॉलिसीच्या एक्सपायरी डेटच्या कमीत कमी 45-60 दिवस अगोदर त्याला नव्या इन्श्युरन्स पॉलिसीसोबत संपर्क करावा लागेल. ग्राहकाला त्यानंतर एक प्रपोजल अर्ज भरावा लागेल. जुन्या इन्श्युरन्स कंपनीशी नवी इन्श्युरन्स कंपनी संपर्क करुन मेडिकल आणि क्लेम हिस्ट्रीची पडताळणी करेल. नव्या इन्श्युरन्स कंपनीला आवश्यक ती सर्व माहिती आणि कागदपत्र मिळाल्यानंतर 15 दिवसांच्या आत आपली पॉलिसी स्वीकारावी लागेल.

Leave a Comment