‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ने तोडला ‘बाहुबली २’चा रेकॉर्ड


भारताच्या बॉक्स ऑफिसवर हॉलिवूडपट ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ने तुफान कमाई केली आहे. चाहत्यांनी या चित्रपटासाठी मोठ्या प्रमाणात तिकीट बुक केले होते. चित्रपटाच्या तिकिटाची अजूनही ऑनलाईन विक्री हाऊसफुल आहे. ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ने भारताच्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. एंडगेमने प्रदर्शनापूर्वीच कोटींची उड्डाण घेतली होती. या चित्रपटाने भारतात प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जवळपास ६३.२१ कोटी रुपयांची कमाई केली होती. बॉक्स ऑफिसवरील कमाईचे सर्व रेकॉर्ड ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ने मोडीत काढले आहेत.

भारतात ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ प्रदर्शित झाल्यापासून पहिल्या आठवड्यात २६० कोटींचा आकडा पार केला आहे. प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाच्या कमाईत कोणतीही कमी आलेली नाही. यासंदर्भात चित्रपट समिक्षक तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, २६०.४० कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘बाहुबली २’चा रेकॉर्ड ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ने तोडला असून ‘बाहुबली २’ने पहिल्या आठवड्यात जवळपास २४७ कोटी रुपयांची कमाई केली होती.

‘अॅव्हेंजर्स एंडगेम’चा असाच परिणाम बॉक्स ऑफिसवर सुरु राहिला तर दुसऱ्या बॉलिवूड चित्रपटांना मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. ‘स्टुडंट ऑफ द ईयर २’ चित्रपट येत्या १० तारखेला प्रदर्शित होणार आहे. परंतु ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ची कमाई अशीच चालू राहिल्यास इतर चित्रपटांवर परिणाम होण्याची, चित्रपटांना मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment