डॉक्टरने दिले चुकीचे इंजेक्शन, 90 जणांना एचआयव्हीची बाधा


कराची : पाकिस्तानातील तब्बल 90 जणांना एका डॉक्टरच्या चुकीची किंमत भोगावी लागत आहे. 65 मुलांसह 90 जणांना एचआयव्ही संसर्ग असलेल्या सुईने इंजेक्शन दिल्यामुळे एचआयव्हीची बाधा झाली आहे. याबाबतची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनीच दिल्याने संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. तपास अधिकाऱ्यांनी याप्रकरणी डॉक्टरला बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक म्हणजे डॉक्टर स्वत:ही एचआयव्ही बाधित असल्याची प्राथमिक माहिती आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉक्टरला आरोग्य विभागाच्या तक्रारीनंतर बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी डॉक्टरही एचआयव्ही बाधित असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. प्रशासनाला गेल्याच आठवड्यात माहिती मिळाली होती, त्यानुसार शहराबाहेरील परिसरात 18 मुलांना एचआयव्हीची बाधा झाली होती. त्यानंतर व्यापक स्तरावर चौकशी झाल्यानंतर या डॉक्टरचा कारनामा समोर आला.

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते, 90 जण आतापर्यंत एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याची सूचना मिळाली आहे. त्यापैकी 65 तर लहान मुलेच आहेत. एकाच डॉक्टरने हे सर्व केले आहे. एचआयव्ही बाधित सुईने त्या डॉक्टरने इंजेक्शन दिल्याने हा प्रकार घडला. आरोपी डॉक्टरला सध्या बेड्या ठोकल्या आहेत, पण एचआयव्हीची 90 जणांना बाधा झाली त्याचे काय, असा प्रश्न आहे. ज्या मुलांना बाधा झाली आहे, त्यांच्या पालकांचीही तपासणी करण्यात आली, मात्र सुदैवाने त्यांना बाधा झालेली नाही. पाकिस्तानात सध्या एचआयव्ही पॉझिटिव्ह आणि एड्सचे रुग्ण तुलनेने कमी आहेत. एड्सचे प्रमाण अंमली पदार्थाचे सेवन करणारे, वेश्या व्यवसाय आणि परदेशातून परतलेल्या मजुरांमध्ये अधिक आहे.

Leave a Comment