अडचणीत सापडली अभिनेते रवी किशन यांची उमेदवारी


लखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकीत वाराणसी मतदारसंघातून लढण्याची घोषणा करणारे जवान तेजबहाद्दूर यांची उमेदवारी रद्द करण्यात आल्यानंतर भाजपलाही आता धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण गोरखपूरमधून भाजपच्या तिकीटावर लढणारे अभिनेते रवी किशन यांची उमेदवारी अडचणीत सापडली आहे.

रवी किशन यांनी या निवडणुकीत गोरखपूरमधून उमेदवारी अर्ज दाखल करताना आपण बारावी उत्तीर्ण असल्याचे सांगितले आहे. पण 2014 च्या निवडणूक शपथपत्रात याच रवी किशन यांनी ते पदवीधर असल्याचे नमूद केले असल्यामुळे रवी किशन आता अडचणीत आले आहेत.

आता विरोधकांकडून रवी किशन यांच्या शपथपत्रातील या तफावतीवरून त्यांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे. गोरखपूरसारख्या हायप्रोफाईल जागेवरील व्यक्तीचीच उमेदवारी धोक्यात आल्याने भाजपच्या अडचणी वाढल्याचे बोलले जात आहे.

उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधून अभिनेता रवी किशन भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. याची अधिकृत घोषणा भाजपने जाहीर केलेल्या 21व्या यादीत करण्यात आली. रवी किशन यांनी 2014मध्ये आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. रवी किशन यांनी 2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर जौनपूरमधून निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत त्यांना हार पत्करावी लागली होती.

Leave a Comment