एका रात्रीत स्टार झालेल्या ‘गंगे’ने दाऊदच्या जवळीकीमुळे सर्वस्व गमावले


यास्मीन जोसेफ हे नाव कदाचित तुमच्या परिचयाचे असेल की नाही ते माहित नाही आणि या नावाने तुम्हाला आम्ही काही माहिती सांगितली तरी ती तुम्हाला कळणार नाही. पण मंदाकिनी हे नाव जर आम्ही तुम्हाला सांगितले तर तुमच्या लक्षात लगेचच ती अभिनेत्री येईल. एका रात्रीत स्टार होणे काय असते हे अभिनेत्री मंदाकिनीशिवाय दुसरे कोणीच सांगू शकत नाही. पण तिच्या आयुष्यात अशा काही गोष्टी वेगाने घडत गेल्या की ज्या वेगाने तिला जे यश मिळाले ते त्याच वेगाने निघूनही गेले.

मंदाकिनी हिने 1985 मध्ये आलेल्या ‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन बॉलिवूडचे शो मॅन राज कपूर यांनी केले होते. आर.के. बॅनरची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे हिरो होते राजीव कपूर तर अभिनेत्री 16 वर्षांची मेरठची मंदाकिनी होती.

या चित्रपटाने पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. मंदाकिनी हे नाव एका रात्रीत देशभरात प्रसिद्ध झाले होते. मंदाकिनीला या चित्रपटाने त्या सर्व गोष्टी दिल्या, ज्याची इतर अभिनेत्रींना आयुष्यभर आस असते. या चित्रपटानंतर मंदाकिनीकडे चित्रपटांच्या ऑफरची रांग लागली होती.

मंदाकिनीने 1985 ते 1990 या पाच वर्षात मिथुन चक्रवर्तीसोबत ‘डांस डांस’, गोविंदासोबत ‘प्यार करके देखो’ आणि अनिल कपूरसोबतच्या हिट चित्रपटांत काम केले. मात्र 1990 नंतर सगळी गणिते बदलली. तिचे नाव या काळात कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी जोडले गेले. मंदाकिनी आणि दाऊदच्या नात्याबद्दल वृत्तपत्रात रकानेच्या रकाने लिहिले जाऊ लागले. जर दिवशी त्यांचे फोटो छापले जात होते. मंदाकिनीने या सगळ्यात कधीच त्यांच्यातील प्रेमसंबंध मान्य केले नाही. आम्ही फक्त चांगले मित्र आहोत असेच ती बोलत राहिली.

मुंबईत 12 मार्च 1993 मध्ये साखळी बॉम्ब हल्ले घडवण्यात आले. दाऊद इब्राहिमचे नाव या हल्ल्याचा मुख्य आरोपी म्हणून समोर आले. अनेक बॉलिवूड कलाकारांची नावे या तपास कार्यात समोर आली. पण एव्हाना दाऊदसोबत मंदाकिनीचे नाव जोडल्या गेल्यामुळे तिचीही चौकशी करण्यात आली होती. तेव्हा असे म्हटले जायचे की दाऊद आणि मंदाकिनीने लग्न केले असून त्यांना दोन मुलेही आहेत. पण याबद्दल दाऊदने आणि मंदाकिनीने कधीच कोणते स्पष्टीकरण दिले नाही.

Leave a Comment