तिसऱ्यांदा स्क्रिन शेअर करणार आयुष्मान-भूमी


आयुष्मान खुरानासोबत ‘दम लगा के हय्शा’ या चित्रपटातून अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने बॉलिवूड पदार्पण केले होते. चाहत्यांचीही त्यांच्या जोडीला भरभरुन पसंती मिळाली. दोघे ‘शुभ मंगल सावधान’ चित्रपटातही झळकले होते. हे दोघेही आता पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र येणार आहेत. दोघांची दिग्दर्शक अमर कौशिक यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका असणार आहे.

‘स्त्री’ चित्रपटाचे अमर कौशिक यांनी दिग्दर्शन केले होते. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरहिट ठरला. ते आता ‘बाला’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. भूमी आणि आयुष्मानची जोडी या चित्रपटामध्ये दिसणार आहे. एकमेकांसोबत पुन्हा एकदा काम करण्यासाठी दोघेही उत्साही आहेत. या चित्रपटापूर्वी दोघांचेही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. भूमी ‘सांड की आँख’ या चित्रपटात शार्प शूटरची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर ‘आर्टीकल १५’ या चित्रपटात आयुष्मान देखील पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिका साकारणार आहे. आता दोघांच्याही ‘बाला’ चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. लवकरच या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे.

Leave a Comment