‘या’ दिवशी रिलीज होणार ‘कुली नंबर १’च्या सिक्वल


१९९५ मध्ये गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘कुली नंबर १’ हा चित्रपट रिलीज झाला होता. प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद डेविड धवन यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाला मिळाला. ज्यानंतर डेविड धवन आता याच चित्रपटाचा सिक्वल घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटाविषयीची अधिकृत घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली होती.


आता यापाठोपाठ चित्रपटाच्या रिलीजची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच १ मे २०२० ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. वरूण धवन या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर त्याच्या अपोझिट सारा अली खानची वर्णी लागली आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला येत्या ऑगस्ट महिन्यात सुरुवात होणार आहे.

याआधीही डेविड धवन यांच्या ‘मैं तेरा हीरो’ आणि ‘जुड़वा 2 ‘ सारख्या चित्रपटात वरूण झळकला होता. हे दोन्ही चित्रपट हिट ठरल्यामुळे, या चित्रपटाला आता प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान या चित्रपटाच्या निमित्ताने सारा आणि वरूणची जोडी पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

Leave a Comment