कोट्यवधींची रॉल्स रॉयस व्रेथ अवतरली रॅपर बादशाहच्या दारी


आपली नवी ओळख प्रस्थापित करण्यासाठी भारतीय कलाविश्वात दररोज असंख्य कलाकार मंडळी येतात. यात अनेकजण यशस्वी ठरतात, तर काहींना अपयशाचा सामना करावा लागतो. आपल्या कामाच्या सुरुवातीच्याच टप्प्यापासून काही कलाकारांना यश मिळू लागते, तर यात काहींचा थोडा जास्त वेळ दवडला जातो. पण, सरतेशेवटी त्यांच्या वाट्याला येणारे यश, मग ते अगदी लवकर असो किंवा उशिरा, मात्र ते आनंद तितकाच देऊन जातात. सध्या रॅपर बाहशाहच्या चेहऱ्यावर असाच आनंद पाहायला मिळत आहे. त्यामागे कारण देखील तसेच आहे.

आपल्या इन्स्टाग्रामवर बादशाहने पोस्ट केलेले एक छायाचित्र पाहून सध्याच्या घडीला असे प्रतित होत आहे की त्याचा आनंद खरच गगनात मावेनासा झाला आहे. आपली वेगळी कला दाखवून पंजाबी आणि हिंदी कलाविश्वात ओळख निर्माण करत रॅप साँगच्या बळावर मोठा झालेला हा बादशाहा आता एका वेगळ्या वळणावर आला आहे, जेथून मागे वळून पाहिले असता त्याला आपण किती दूरची वाट चालत आलो आहोत, हे लक्षात येत आहे. बाहशाहने आपल्या पोस्टखाली ‘हा प्रवास खूप मोठा होता….. दूरचा होता… कुटुंबात तुझे स्वागत असल्याचे कॅप्शन लिहित त्याच्या कुटुंबातील नव्या आणि खऱ्या अर्थाने मौल्यवान सदस्याची ओळख करुन दिली आहे. आलिशान ‘रोल्स रॉयस व्रेथ’ ही त्याच्या घरातील नवीन सदस्य आहे. भारतात या आलिशान गाडीची सध्याच्या घडीला किंमत ६.४६ कोटींच्या घरात आहे.


रॉल्स रॉयसच्या आलिशान गाड्या या सुरुवातीपासूनच श्रीमंतीचे एक प्रतिक म्हणून ओळखल्या जातात. आता त्यातही बादशाहने ही नवी पाहुणी आपल्या कुटुंबात आणली आहे, म्हटल्यावर चर्चा तर होणार एवढे मात्र नक्की. व्रेथबाबत सांगायचे झाले तर तिची सरळ आणि सोप्या भाषेत ‘Wraith is a motor car for those with an insatiable thirst for adventure’ अशी ओळख खुद्द रोल्स रॉयसच्या अधिकृत संकेतस्थळाकड़ून करण्यात आली आहे.

या नव्या रॉल्स रॉयस व्रेथचे छायाचित्र बादशाहने त्याच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केल्यानंतर कलाविश्वातील सेलिब्रिटींनी त्यावर कमेंट करत बादशाहचे अभिनंदन केले. त्याला शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये अभिनेता रणवीर सिंगचाही समावेश होता. रणवीरने राजाच्या मुकुटाची चिन्ह पोस्ट करत त्याचे अभिनंदन केले, ज्याचे आभार मानत ‘अपना टाईन आ गया….. ‘, असं बाहशाहने लिहिले.

Leave a Comment