या तरुणीने सहा निरनिराळ्या चालींमध्ये म्हटली हनुमान चालीसा


तुलसीदास लिखित हनुमान चालीसाचे पठन आपल्यापैकी अनेक जण नेमाने करीत असतील. मात्र आता ही हनुमान चालीसा सहा प्रकारच्या निरनिरळ्या चालींमध्ये ऐकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. साऊथ आफ्रिका येथील जोहानसबर्गची रहिवासी असलेली वंदना नारन हिने सहा निरनिराळ्या चालींमध्ये हनुमान चालीसा गायिली असून या हनुमान चालीसाच्या पठानाची सीडी आता उपलब्ध झाली आहे. वंदना नारन मूळची भारतीय असली, तरी आता ती दक्षिण आफ्रिकेमध्ये स्थायिक झाली आहे.

जोहानसबर्ग जवळील लेनासिया येथे पार पडलेल्या वार्षिक संयुक्त हनुमान चालीसा पठनाच्या कार्यक्रमामध्येही वंदना यांनी निरनिरळ्या चालींमध्ये हनुमान चालीसा प्रस्तुत केल्या. वेगवेगळ्या वयोगटातील लोकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या चालींमध्ये हनुमान चालीसा गाण्याची कल्पना आपण उपयोगात आणली असल्याचे वंदना यांनी म्हटले आहे. यामध्ये वडीलधाऱ्या मंडळींना पसंत पडेल अशा पारंपारिक चालीमध्ये हनुमान चालीसाचे पठन केले गेले असून, तरुणाईला आकर्षित करणारे आधुनिक संगीतबद्ध हनुमान चालीसाचे पठनही यामध्ये ऐकावयास मिळते.

हनुमान चालीसाचे पठन करताना याच्या मूळ शब्दरचनेमध्ये कोणतेही बदल केले गेले नसून, केवळ चालींमध्ये वैविध्य आणले गेले असल्याचे वंदना यांनी म्हटले आहे. वंदना यांनी आजवर अनेक स्थानीय गायन स्पर्धांमध्ये भाग घेतला असून, यांतील अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी विजेतेपदही मिळविले आहे. वंदना यांचे पिता अमेरिकेमध्ये नोकरीनिमित्त रहात असताना वंदना यांनी तिथे भारतीय शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. दक्षिण आफ्रिकेमध्ये स्थलांतरित झाल्यानंतर त्यांची शास्त्रीय संगीतातील रुची आणखीनच वाढली, आणि त्यांनी आपले संगीताचे प्रशिक्षण सुरु ठेवले. केवळ वंदनालाच नाही, तर वंदनाच्या सर्वच परिवारजनांना भारतीय संगीताची आवड आहे.

Leave a Comment