आयपीएलमधील श्रीमंत संघाच्या ‘महागुरू’ला किती पैसे मिळतात ?


मुंबई : सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर या तीन दिग्गज खेळाडूंचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) क्रिकेट सल्लागार समितीत समावेश असून हे तिघेही सल्लागार समितीच्या सदसत्वासह इंडियन प्रीमिअर लीगमधील (आयपीएल) विविध संघांच्या सल्लागारपदीही असल्यामुळेच या तिघांनाही परस्पर हितसंबंध जपल्या प्रकरणी बीसीसीआयचे लोकपाल डी के जैन यांनी नोटीस पाठवली होती. महान फलंदाज तेंडुलकरने त्यावर उत्तर पाठवले. त्याने आपला मुंबई इंडियन्स संघाच्या निवड प्रक्रियेत सहभाग नसल्याचे त्यात स्पष्ट केला. पण, त्याच्या आणखी एका उत्तराने त्याचवेळी क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे.

बीसीसीआयकडे तेंडुलकर आणि लक्ष्मण यांच्याबाबत मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे (एमपीसीए) सदस्य संजीव गुप्ता यांनी तक्रार केली होती. तेंडुलकर आणि लक्ष्मण बीसीसीआयच्या सल्लागार समितीमध्ये आहेत, त्याचबरोबर ते आयपीएलच्या संघाचाही एक भाग आहेत. त्यामुळे परस्पर हितसंबंध जपले जात असल्याची भूमिका गुप्ता यांनी यामध्ये मांडली होती. बीसीसीआयचे लोकपालांनी त्यानुसार तेंडुलकर व लक्ष्मणला नोटीस पाठवली होती. तेंडुलकर व लक्ष्मण यांच्याकडून 28 एप्रिलपर्यंत लेखी स्पष्टीकरण जैन यांनी मागितले होते, बीसीसीआयकडूनही स्पष्टीकरण मागवले आहे. दिलेल्या मुदतीमध्ये सचिन व लक्ष्मण यांनी आपली बाजू मांडली नाही, तर त्यानंतर त्यांना दुसरी संधी दिली जाणार नसल्याचेही, लोकपालांनी स्पष्ट केले होते.

तेंडुलकरने या नोटीशीला उत्तर पाठवले आहे. त्याने आपल्या उत्तरामध्ये म्हटले आहे की, मला आयपीएलमधील मुंबई इंडियन्स या संघाकडून कोणताही लाभ मिळत नाही. त्याचबरोबर माझा संघाच्या निवड प्रक्रियेमध्ये सहभाग नसल्यामुळे यामध्ये परस्पर हितसंबंध जपला जात नाही. तेंडुलकरला आयपीएलमधील सर्वात श्रीमंत संघांमध्ये आघाडीवर असलेल्या मुंबई इंडियन्सकडून एक रुपयाही मिळत नसल्याचे ऐकून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

सचिन मुंबई इंडियन्सचा, तर लक्ष्मण सनरायझर्स हैदराबादचा मेंटर आहे. यंदाचे परस्पर हितसंबंध जपल्याबद्दलचे हे तिसरे प्रकरण समोर आले आहे. माजी कर्णधार सौरव गांगुलीवर याआधी प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष, सीएसी सदस्य आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचा तो सल्लागार अशा तीन भूमिकेत होता. यासाठी गांगुलीला निवृत्त न्यायाधिश जैन यांच्यापुढे सनावणीसाठी उपस्थित रहावे लागले होते.

Leave a Comment