पुरुष एकदिवसीय सामन्यामध्ये अंपायरिंग करणारी पहिली महिला


दुबई – पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेत पहिल्यांदाच एक महिला पंचाची भूमिका निभावणार आहे. या महिला पंचाचे क्लेयर पोलोसेक, असे नाव असून कधीही क्रिकेट क्लेयर पोलोसेकने खेळले नाही. तसेच ती पंच होण्यासाठी लागणाऱ्या अनेक परीक्षांत नापास झाली. पण आज तिने तरीही पुरुषांच्या एकदिवसीय सामन्यात पंच म्हणून काम करत इतिहास घडवला.

शनिवारी वर्ल्ड क्रिकेट लीगच्या दुसऱ्या डिव्हिजनमध्ये नामीबिया आणि ओमान यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात क्लेयर हिने पंच म्हणून काम पाहिले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यावेळी ३१ वर्षीय क्लेयर पोलोसेक हिला शुभेच्छा दिल्या. क्लेयरने यापूर्वी महिलांच्या १५ एकदिवसीय क्रिकेट सामन्यात पंच म्हणून काम पाहिले आहे. तिने २०१६ साली ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यात पहिल्यांदा पंच म्हणून काम केले. मागील वर्षी तिने इंग्लंड आणि भारत यांच्यात झालेल्या टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये देखील पंचाची भूमिका पार पाडली.

प्रतिक्रिया देताना क्लेयर म्हणाली की, मी पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात पंच म्हणून काम पाहण्यासाठी उत्सुक होते. क्रिकेट मला पहिल्यापासून फार आवडायचे. महिलांना पंच म्हणून पुढे येण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. माझ्या वडिलांनी मी पंच व्हावे यासाठी खूप प्रोत्साहन दिले. २०१७ साली महिलांच्या एकदिवसीय विश्वचषकातील ४ सामन्यात क्लेयर पोलोसेकने पंच म्हणून काम पाहिले. ती ऑस्ट्रेलियातील स्थानिक सामन्यात पुरुषांच्या क्रिकेट सामन्यात पंच म्हणून काम करणारी पहिली महिला यापूर्वी ठरली आहे.

Leave a Comment