पंतप्रधानपद? छे छे! संगीत खुर्चीच!


लोकसभा निवडणुकीचा अर्धा प्रवास पूर्ण झालेला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एका वक्तव्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. पंतप्रधानपदासाठी संभाव्य नावांची यादी जाहीर करून त्यांनी अगोदरच असलेला संभ्रम वाढवण्यासच मदत केली आहे.

शरद पवार हे देशाच्या राजकारणातील एक दिग्गज आणि ज्येष्ठ नेते आहेत.या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) बहुमत मिळाले नाही, तर ममता बॅनर्जी, मायावती किंवा चंद्राबाबू नायडू यांच्यापैकी कोणी तरी पंतप्रधान होईल, अशी भविष्यवाणी त्यंनी केली. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पवार यांनी हे मत व्यक्त केले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळणे अतिशय कठीण आहे. एनडीएला बहुमत मिळाले नाही तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मु्ख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती हे तीन नेते मला पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार वाटतात,” असे पवार म्हणाले.

अपेक्षेप्रमाणे त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. मुख्यतः काँग्रेसला मिरच्या झोंबल्या आणि राहुल गांधीच आगामी पंतप्रधान असतील, हे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले. भाजपविरोधी आघाडीचे नेतृत्व आपल्याकडेच आहे, हा काँग्रेसचा दावा आहे. त्यामुळे काँग्रेसला हे वक्तव्य खपणे अजिबात शक्य नव्हते. एक प्रकारे पवार यांनी पंतप्रधानपदाच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीतून राहुल गांधींचे नाव कापले आहे. इतकेच नव्हे, तर राहुल गांधी हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीतच नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

यातून झाले काय, की भाजपविरोधी पक्षांमधील अंतर्गत मतभेद पु्न्हा समोर आले. एकीकडे भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीएत पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींचा लोकप्रिय चेहरा आहे तर दुसरीकडे भाजपविरोधी आघाडीमध्ये यावरून एकवाक्यता नाही, असे चित्र निर्माण झाले.

अर्थात पवार म्हणाले त्यात खोटे काहीच नाही. मायावती, ममता आणि चंद्राबाबू यांना पंतप्रधान बनण्याची महत्त्वाकांक्षा आहे, हे सगळेच जाणतात. या तिन्ही नेत्यांनी वेळोवेळी शक्तिप्रदर्शन करून ते दाखवूनही दिले आहे. भाजपला सत्तेतून घालविण्यासाठी जी भाजपविरोधी आघाडी उभी राहत आहे, तिचे स्वाभाविक नेतृत्त्व आपल्याकडे असल्याचे ममता बॅनर्जी यांना प्रामाणिकपणे वाटते. हे नेतृत्त्व आपल्याकडे घ्यायचे झाले तर काँग्रेसला या आघाडीतून बाहेर काढावे लागेल, हे ममतांना पक्केपणी माहीत आहे. म्हणून काँग्रेस प्रादेशिक पक्षांना सन्मान देत नाही, ही तक्रार त्यांनी अनेक वेळेस केली आहे. इतकेच नाही तर काँग्रेसपासून हातभर अंतर ठेवले आहे.

देशाच्या सर्वोच्च पदावर एखाद्या दलित नेत्याने विराजमान व्हावे, ही मायावती यांची इच्छा आहे. तसेच त्यांच्या दृष्टीने आज देशातील सर्वात मोठ्या दलित नेत्या त्याच आहेत. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षासोबत युती करून मायावतींनी आपली प्रतिमा मोठी करण्याचे प्रयत्न सुरू केला आहे.

चंद्राबाबु नायडू यांनीही गेल्या वर्षी एनडीएची साथ सोडल्यानंतर विरोधकांच्या एकीचे सूत्रधार बनण्याचे प्रयत्न चालवले आहेत. विरोधी पक्षांच्या विविध नेत्यांनी त्यांनी भेटीगाठी घेतल्या आहेत. मोदी यांनी अपमानित केल्याचा दावा करून त्यांनी या अपमानाचा बदला घेण्याचीही भाषा केली आहे.

शरद पवार यांनी याआधीही अनेकवेळा सर्व विरोधकांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. सर्वांनी एकत्र येण्यासाठी समन्वयक म्हणून काम करण्याची तयारीही दाखवली आहे. पवार यांची ही राजकीय उंची काँग्रेसलाही माहीत आहे. सर्व भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणू शकेल, असे एकमेव नेते पवार आहेत. म्हणूनच ममता बॅनर्जी, नवीन पटनायक, चंद्राबाबू नायडू, चंद्रशेखर राव, ओमर अब्दुल्ला, मायावती आणि अखिलेश यादव यांच्यासहित सर्व नेते पवार यांच्याशी चर्चा करतात. मात्र म्हणून त्यांच्यामध्ये पंतप्रधानपदावरून एकमत होईल आणि ते एकमेकांशी भांडण करणार नाहीत, याची खात्री देता येणार नाही. शिवाय पवारांचे समर्थकही त्यांच्यात भावी पंतप्रधान पाहतात, ते वेगळेच!

लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसच्या भाजपविरोधी मोहिमेला समर्थन देण्याची सर्व विरोधी पक्षांनी ग्वाही दिली होती. मात्र आतल्या आत या सर्व पक्षांनी आपापल्या चाली रचल्या होत्या, ही वस्तुस्थिती आहे. त्या चाली आता उघड होत आहेत. या वेगवेगळ्या नेत्यांचा कथनी आणि करणी पाहिली तर सर्वांची नजर पंतप्रधानपदावर आहे, हे स्पष्ट दिसते. भाजप आणि मोदींना सत्तेतून बेदखल करण्यात विरोधी पक्ष आणि महाआघाडी यशस्वी ठरली, तरी निवडणुकीनंतर पंतप्रधानपदावरून त्यांच्यात संगीत खुर्चीचा खेळ रंगणार, याचीच ही पावती आहे.

Leave a Comment