जगभरातील सिनेरसिकांमध्ये ‘जेम्स बॉण्ड’ ही व्यक्तिरेखा सर्वात लोकप्रिय आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ‘बॉण्ड’ या सिरिजमधील २५ वा चित्रपट येणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला २८ एप्रिलपासून जमायका येथे सुरूवात होणार असल्याची माहिती चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
तयार व्हा येत आहे २५ वा बॉण्डपट
डॅनियल क्रेग हा ‘जेम्स बॉण्ड’ चित्रपटाच्या २५ व्या भागात ‘जेम्स बॉण्ड’च्या भूमिकेत दिसणार आहे. तब्बल पाचव्यांदा डॅनियल ‘एजंट ००७’ च्या रूपात दिसणार आहे. त्याला या भूमिकेसाठी तब्बल ४५० कोटीचे मानधन मिळाले असल्याचे बोलले जात आहे. २००६ पासून तो ‘जेम्स बॉण्ड’ची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रमी मलेक ही देखील झळकणार आहे.
जपान आणि दक्षिण फ्रान्समध्ये या चित्रपटाचे शूटिंग होणार आहे. रेमंड बेन्सन यांच्या ‘नेव्हर ड्रिम्स ऑफ डाईंग’ या कादंबरीवर आधारित चित्रपटाची कथा आहे. कॅरी जोजी फुफुनागा या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत.