माझी प्रकृती उत्तम, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका – वैभव मांगले


अभिनेते वैभव मांगले यांना वाढलेल्या तापमानामुळे अशक्तपणा येऊन चक्कर आली. पण माझी प्रकृती आता ठणठणीत असून माझ्याबाबत आलेल्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन मांगले यांनी केले आहे. वैभव मांगले सांगलीमध्ये नाटकाच्या प्रयोगादरम्यान चक्कर येऊन स्टेजवर कोसळले होते.

शुक्रवारी सांगलीच्या विष्णूदास भावे नाट्यगृहात अलबत्या-खलबत्या या नाटकाच्या प्रयोगावेळी मुख्य कलाकार आणि प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले हे चक्कर येऊन स्टेजवर कोसळले. ही घटना प्रयोग संपण्याच्या शेवटच्या दहा मिनिटात घडल्यानंतर नाटक रद्द करत तातडीने संयोजकांनी मांगले यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण मांगले यांच्या प्रकृतीबाबत काही क्षणात अफवा उठल्या होत्या.

हृदयविकाराचा झटका त्यांना आल्याची अफवाही पसरली होती. पण खुद्द मांगले यांनी काही वेळातच सर्व अफवांचे खंडन करत आपली प्रकृती उत्तम असल्याचे स्पष्ट केले. सांगलीत वाढलेले तापमान आणि नाट्यगृहात एसी नसल्याने यासोबतच नाटकातील चेटकीणीच्या भूमिकेचा हेवी कॉस्टयूम यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊन चक्कर आल्याचे वैभव मांगले यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment