मोदींच्या मुंबईतील सभेतून अनेकांचा काढता पाय


मुंबई – नाशिक येथील पिंपळगावमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत अनेकांनी भाषण सुरू असताना श्रोत्यांनी काढता पाय घेतल्याची घटना ताजी असतानाच आता मुंबईमधील वांद्रे येथील सभेतूनही अनेकांनी काढता पाय घेतल्याचे चित्र दिसून आले आहे.

वांद्रेच्या एमएमआरडीए मैदानात भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदींची संयुक्त सभा झाली. साडेआठ दरम्यान मोदींनी या सभेत भाषणाला सुरुवात केली. मोदींचे तब्बल सव्वा तास भाषण सुरू होते. पण मोदींचे भाषण सुरू असतानाच अनेकांनी काढता पाय घेतला. महिलांचा यात मोठ्या प्रमाणात समावेश होता. मुंबईतील कानाकोपऱ्यातून हजारो लोक संध्याकाळी ५ वाजेपासून सभेसाठी आले होते.

लोक वाढत्या उन्हामुळे आधीच त्रस्त झाले होते. यातच भाषण लांबल्यामुळे घरी जायची घाई लोकांना झाली होती. तसेच 80 हजार ते एक लाख लोक एमएमआरडीएच्या मैदानात येतील, असा अंदाज भाजपच्या आयोजकांना होता. पण श्रोत्यांसाठी ठेवलेल्या शेकडो खूर्च्या आधीपासूनच मोकळ्या होत्या. त्यातच मोदींचे भाषण सुरू असताना लोक सभेतून बाहेर पडू लागले होते. यावेळी काय करावे आयोजकांनाही कळत नव्हते. पण विरोधकांनी भाजपला या सभेबाबत चांगलेच धारेवर धरले आहे. या निवडणुकीतही मोदी लाट असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येतो. पण सभेतून काढता पाय घेतल्याचे दृश्य पाहताच मोदी लाट केव्हाच ओसरली असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.

Leave a Comment