सुरतच्या दोन बहिणींवर नारायण साईनेच केला बलात्कार


गांधीनगर (गुजरात) – आसाराम बापू बलात्काराच्या आरोपाखाली सध्या तुरुंगवास भोगत असून आता त्याच्या मुलाच्या विरोधातही बलात्काराचा आरोप सिद्ध झाला आहे. २०१३ मध्ये दाखल करण्यात आलेल्या खटल्यावर सुनावणी करत सुरत सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. सुरतच्या दोन बहिणींनी यामध्ये नारायण साईंवर आरोप केले होते.

हरियाणाच्या कुरुक्षेत्र येथून २०१३ साली नारायण साईला अटक करण्यात आली होती. साई आणि आसाराम विरोधात बलात्काराचा खटला सुरतच्या दोन बहिणींनी दाखल केला होता. यापैकी एका बहिणीने आपण २००२ ते २००५मध्ये सुरत येथील आश्रमात राहात असताना नारायण साईने आपल्यावर बलात्कार केल्याचे म्हटले होते. तर, दुसरीने १९९७ ते २००६ दरम्यान आश्रमात असताना आपल्यावर अत्याचार झाला होता, असे सांगितले होते.

आपल्यावर झालेल्या अत्याचारावर दोन्ही बहिणींनी वेगवेगळी तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी त्यानंतर दोघांच्याही आश्रमांना टाळे ठोकले होते. त्याच्याबरोबर इतर ४ व्यक्तींनाही अटक करण्यात आली होती. सुरत न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर आता साई उच्च न्यायालयात आव्हान करण्याचे संकेत आहेत.

Leave a Comment