यामुळे निवडणुकीतून बाहेर होऊ शकतो गौतम गंभीर


नवी दिल्ली – २ मतदान कार्ड असल्यावरून नुकताच भाजमध्ये प्रवेश केलेला माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर गोत्यात सापडला आहे. दिल्लीच्या तीसहजारी न्यायालयात त्याच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. आम आदमी पक्षाच्या नेत्या अतिशी यांनी हा खटला दाखल केला असून या प्रकरणाची १ मे रोजी सुनावणी होईल.

काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये गौतम गंभीर याने प्रवेश केला होता. भाजपने त्यानंतर त्याला पूर्व दिल्ली लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली. आपण राजेंद्र नगर मतदार संघात मोडतो, असे गंभीरने शपथपत्रामध्ये नमूद केले आहे. पण त्याच्या या उमेदवारीवर गदा येण्याची शक्यता आहे. कारण दिल्लीच्या राजेंद्र नगर आणि करोल बाग या २ विधानसभा क्षेत्राच्या मतदार यादीमध्ये गौतम गंभीर याचे नाव नमूद असल्याचा ठपका आपने ठेवला आहे.

एकापेक्षा जास्त मतदार संघाच्या मतदार यादीमध्ये नाव असणे हे लोकप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन आहे. तीसहजारी न्यायालय १ मे रोजी या प्रकरणावर सुनावणी करणार आहे. जर त्यात गंभीर दोषी आढळला तर कायद्यान्वये त्याला ही निवडणूक लढण्यापासून वंचित रहावे लागेल. ही तक्रार आम आदमी पक्षाने हरण्याच्या भीतीमुळे दाखल केली, असे दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांचे म्हणणे आहे. गौतम गंभीरचे सर्व कागदपत्रे बरोबर आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे.

Leave a Comment