महायुतीला अरुण गवळीच्या पक्षाचे समर्थन


मुंबई : आता शेवटच्या टप्प्यात लोकसभा निवडणुका आल्या आहेत. येत्या 29 एप्रिलला निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान होणार असल्यामुळे सर्वच पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्यातच आता गँगस्टर अरुण गवळीच्या पक्षाचे नाव दक्षिण मुंबईच्या राजकारणात जोडले गेल्याने तेथील निवडणुकीची रंगत वाढली आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात अरुण गवळीच्या ‘अखिल भारतीय सेना’ या पक्षाने महायुतीला जाहीर पाठिंबा दिला आहे.

अखिल भारतीय सेनेने दक्षिण मुंबईचे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांना पाठिंबा जाहीर केला आहे. अरुण गवळी यांच्या पत्नी आशा गवळी, मुलगी गीता गवळी आणि विजय अहीर यांच्याशी यासंदर्भात कामहायुतीचे कोकण समन्वयक आमदार प्रसाद लाड, शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर आणि बीएमसी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. गीता गवळी यांनी यावेळी त्यांचा पक्ष हा महायुतीला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले.

शिवसेनेचे नेते आणि विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि उमेदवार मिलिंद देवरा यांच्यात दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात लढत होत आहे. आधीच मनसेने मिलिंद देवरा यांना समर्थन दिल्याने अरविंद सावंत यांच्या अडचणीत वाढ झाली होती. पण आता गवळीचा पक्ष महायुतीला पाठिंबा देणार असल्याने ही लढत अधिक रंगतदार होणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात दक्षिण मुंबईसोबतच महाराष्ट्रातील एकूण 17 लोकसभेच्या जागांसाठी येत्या 29 एप्रिलला मतदान होणार आहे. तर 23 मे रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत.

Leave a Comment