राज ठाकरेंना ‘बघाच तो व्हिडिओ’ च्या माध्यमातून प्रत्युत्तर


मुंबई – राज्यभर प्रचारसभांचा धडाका लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक आरोप केले होते. त्यांनी मोदींची जुनी भाषण, जाहीरातीचे व्हिडिओ दाखवून भाजपच्या दाव्यांची पोलखोल केली होती. भाजपने आज वांद्रयाच्या रंगशारदा सभागृहामध्ये या सर्व टीकेला ‘बघाच तो व्हिडिओ’ च्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले.

व्हिडिओच्या माध्यमातून राज ठाकरेंनी केलेले आरोप कसे अर्धवट, अर्धसत्यावर आधारीत आहेत ते दाखवले. प्रेझेंटेशनच्या माध्यमातून राज ठाकरेंच्या दाव्यांची पोलखोल करताना मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी भावनिक उदगारही काढले.

व्यक्तिगत जीवनात आशिष शेलार आणि राज ठाकरे हे परस्परांचे चांगले मित्र आहेत. त्यांची राजकारणापलीकडे असणारी मैत्री सर्वांनाच माहित आहे. राज ठाकरेंवर आशिष शेलारांनी बोचरी टीका केली तरी ते अनेकदा कृष्णकुंजवर राज ठाकरेंना भेटायला जात असतात. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला राज ठाकरेंनी पाठिंबा दिला आहे. ते आपल्या प्रचारसभांमधून भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांना पराभूत करण्याचे आवाहन करत आहेत. आशिष शेलार यांनी तोच धागा पकडून ‘मित्रा तू खरंच’ चुकलास असे भावनिक उदगार काढले.

Leave a Comment