एवढ्या संपत्तीचे मालक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी


लखनौ – वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी दिलेल्या शपथ पत्रामध्ये त्यांच्या संपत्तीचे तपशील देण्यात आले आहे. एकूण 2.5 कोटी रुपयांची संपत्ती मोदींकडे असून मोदींना पैसे राजकीय पदांमुळे मिळणारा सरकारी पगार आणि बँकांमध्ये असलेल्या ठेवीवरील व्याजातूनच मिळतो. मोदींना या व्यतिरिक्त उत्पन्नाचे दुसरे कुठलेही साधन नाही.

मोदींनी वाराणसीचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अन्नपूर्णा शुक्ला यांचे चरण स्पर्श केले. त्यांच्या डोक्यावर हात ठेऊन अन्नपूर्णा देवींनी आशीर्वाद दिला. अर्जासोबत मोदींनी सादर केलेल्या शपथपत्रात त्यांच्या संपत्तीचे तपशील देण्यात आले आहे. एक घर मोदींच्या नावावर असून त्यांच्याकडे एकही गाडी नाही. तसेच, जमिनीचा एक तुकडाही मोदींच्या नावावर नाही.

गेल्या लोकसभा निवडणुकांपेक्षा यंदा मोदींचे उत्पन्न दुप्पट झाल्याचे दिसून येते. 2013-14 साली मोदींचे उत्पन्न 9 लाख 69 हजार 711 रुपये होते. तर, 2018-19 या वर्षभरातील उत्पन्न 19 लाख 92 हजार 520 रुपये एवढे आहे. मोदींच्या संपत्तीत 2014 पासून दरवर्षी वाढ झाली आहे. पण, मोदींच्या संपत्तीत 2016-17 मध्ये 2015-16 पेक्षा घट झाल्याचे दिसून येते. ही घट जवळपास 4 लाख 70 हजार रुपयांची दिसत आहे. त्यानंतर, मोदींचे 2018-19 मध्ये वार्षिक उत्पन्न जवळपास 20 लाख रुपये आहे.

प्रतिज्ञापत्रात पत्नी जशोदाबेन यांच्या नावाचा उल्लेख मोदींनी केला आहे. पण त्यांचे पॅन कार्ड नंबर आणि उत्पन्नाबाबत माहित नसल्याचा उल्लेख केला आहे. त्याचबरोबर त्यांची शैक्षणिक पात्रता, व्यवसाय, संपत्ती इत्यादीबाबतही माहित नसल्याचा उल्लेख शपथपत्रात करण्यात आला आहे. दरम्यान, दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर पंतप्रधान मोदी असून त्यांनी गुरुवारी वाराणसीमध्ये भव्य रोडशो केला. जनतेचा मोठा प्रतिसाद या रोड शोला मिळाला होता. त्यानंतर, मोदींनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

Leave a Comment