साध्वी प्रज्ञाविरोधात निवडणूक लढवणार शहीद करकरेंचा महाराष्ट्रातील सहकारी


भोपाळ : शहीद हेमंत करकरे यांच्याबद्द्ल भाजपच्या भोपाळमधील उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूरने केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचे पडसाद थांबताना दिसत नाही. प्रज्ञा ठाकूर यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय शहीद हेमंत करकरे यांचे सहकारी माजी सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) रियाज देशमुख यांनी घेतला आहे. भोपाळ लोकसभा मतदारसंघातून देशमुख अपक्ष अर्ज दाखल करत आहेत. भाजपकडून भोपाळच्या निवडणूक मैदानात प्रज्ञा ठाकूरही आहेत.

शहीद हेमंत करकरे यांच्याबद्द्ल प्रज्ञा ठाकूर यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्याविरोधात निवडणूक लढण्याचा निर्णय रियाज देशमुख यांनी घेतला. देशमुख म्हणाले, 12 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी भोपाळमध्ये मी अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करत आहे. कोणीही शहीद हेमंत करकरेंची बदनामी करु नये, अशी माझी इच्छा आहे. त्यामुळेच मी प्रज्ञा ठाकूरविरोधात निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे.

महाराष्ट्रातील सर्वात चांगल्या आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांपैकी हेमंत करकरे एक होते. मला अनेक प्रकरणांचा तपास करताना त्यांनी मार्गदर्शन केले आणि माझ्या पाठीशी उभे राहिल्यामुळे शहीद हेमंत करकरेंबाबत अपमानास्पद वक्तव्य मी कधीही सहन करु शकत नसल्याचे मत रियाज देशमुख यांनी व्यक्त केले.

Leave a Comment