जाणून घेऊया विलियम शेक्सपिअरबद्दल काही रोचक तथ्ये

william-sheakspear
जगप्रसिद्ध लेखक आणि नाटककार विलियम शेक्सपिअर यांच्या स्मृती प्रीत्यर्थ २३ एप्रिल हा दिवस दरवर्षी ‘शेक्सपिअर दिन’ म्हणून साजरा केला जातो. २३ एप्रिल १५६४ साली या नामवंत लेखकाचा जन्म झाला. शेक्सपिअर यांचा उल्लेख ‘बार्ड ऑफ एव्हॉन’ या नावानेही केला जातो. त्यांचा जन्म वॉर्विकशर येथे झाला होता. शेक्सपिअर यांचा जन्म २३ एप्रिल १५६४ साली झाला असून, त्यानंतर २६ एप्रिल रोजी त्यांचा बातिस्मा ही करण्यात आला होता. जाणून घेऊ या या नामवंत लेखकाबद्दल काही रोचक तथ्ये.

शेक्सपिअर यांच्या अतिशय गाजलेल्या कविता आणि नाटकांच्या व्यतिरिक्त त्यांची महत्वाची, उल्लेखनीय कामगिरी अशी, की आपल्या लेखनाच्या माध्यमातून शेक्सपिअर यांनी इंग्रजी भाषेला तब्बल तीन हजार नवीन शब्द बहाल केले. याचा उल्लेख ‘ऑक्सफर्ड डिक्शनरीज्’ च्या वतीने करण्यात आला असून, या शब्दकोशामध्ये असलेल्या शब्दांमधील अनेक शब्द शेक्सपिअर यांनी सर्वप्रथम इंग्रजी भाषेला दिले असल्याचे म्हटले आहे. शेक्सपियर यांच्याबद्दल आणखी एक रोचक तथ्य असे, की त्यांच्या समाधीस्थळावर एक शाप अंकित आहे. या समाधीस्थळामध्ये दफन असलेल्या शेक्सपिअर यांच्या अस्थी जो कोणी बाहेर काढू धजेल, ती व्यक्ती शापित ठरेल असा धोक्याचा इशारा या समाधीस्थळावर अंकित आहे.

शेक्सपिअर यांनी लिहिलेल्या ३९ नाटकांपैकी तब्बल तेरा नाटकांमध्ये एखादे पात्र आत्महत्या करीत असल्याचे प्रसंग आहेत. यामध्ये ‘रोमियो अँड ज्युलीयेट’ या नाटकाचा समावेश असून, या नाटकामध्येही रोमियो व ज्युलीयेट आत्महत्या करीत असल्याचा प्रसंग आहे. शेक्सपिअर यांनी लिहिलेल्या नाटकांपैकी ‘द कॉमेडी ऑफ एरर्स’ हे नाटक सर्वात लहान, तर ‘हॅम्लेट’ हे नाटक सर्वात मोठे आहे.

शेक्सपियर यांचा जन्म १५६४ साली जाला असून, त्यांचे एकंदर आयुष्य, त्यांचे लेखन यांचे वर्णन करणारी अनेक लेख, पुस्तके अस्तित्वात असली, तरी १५८५ ते १५९२ या सात वर्षांच्या काळामध्ये मात्र शेक्सपिअर नक्की कुठे होते, आणि काय करीत होते याचा उल्लेख मात्र कुठेच सापडत नाही. काही तज्ञांच्या मते या काळामध्ये शेक्सपिअर कायद्याचा अभ्यास करण्यात गुंग होते, तर काहीच्या मते या काळामध्ये शेक्सपिअर यांनी जगभ्रमंती केली, तर आणखी काही मतांच्या नुसार या काळामध्ये शेक्सपिअर एका थियेटर ग्रुपमध्ये सहभागी झाले असल्याचे म्हटले जाते.

Leave a Comment