लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात देशात आणि राज्यात झाले एवढे टक्के मतदान

election
नवी दिल्ली : ११६ लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यातील मतदान पार पडले. या टप्प्यात देशभरात साडे पाच वाजेपर्यंत एकूण ६१.३१ टक्के मतदान झाले. तर महाराष्ट्रात ५५.०५ टक्के मतदान झाले आहे. सकाळी देशभर सतराव्या लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली. राज्यातील १४ तर देशभरातील ११६ जागांवर संध्याकाळी पाचवाजेपर्यंत मतदान झाले. मतदारांनी सकाळी सात वाजल्यापासून मतदान केंद्रांवर गर्दी केली आहे. आज राज्यातील पुणे, बारामती, सातारा, अहमदनगर या महत्त्वाच्या जागांवरील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदान झाले मतदानाचे प्रमाण तिथे ७८.९४ टक्के एवढे होते. तर त्यानंतर सर्वाधिक मतदान आसाममध्ये ७४.०५ टक्के त्याखालोखाल गोव्यामध्ये ७०,९६ टक्के मतदान झाले आहे. तर केरळमध्ये मतदानाला गालबोट लागले आहे. सहा मतदारांचा येथे कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली. तसेच पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान काही अप्रिय घटना घडल्या. काही अज्ञात लोकांनी मुर्शीदाबाद येथील एका मतदान केंद्राजवळ हातबॉम्ब फेकल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या हल्ल्यामध्ये कोणतेही नुकसान झालेले नसले तरी मतदारांना घाबरवण्यासाठी हा हल्ला केला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.

मतदानादरम्यान प. बंगालमधील एका मतदाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मुर्शिदाबाद लोकसभा मतदारसंघातील बालीग्राम येथील मतदान केंद्रावर काँग्रेस आणि तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या भांडणात मतदानासाठी रांगेत उभ्या असलेला एक मतदार गंभीररित्या जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात १४ मतदारसंघात ४६.२८ टक्के मतदान झाले. रावेर लोकसभा मतदार संघात ३ वाजेपर्यंत ४६.०३ टक्के मतदान झाले. तर जळगाव लोकसभा मतदारसंघात ३ वाजेपर्यंत ४२.६१ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली होती. अहमदनगर येथे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत नगर मतदारसंघात ५४ टक्के मतदान झाले. तर पुण्यातील बारामती लोकसभा मतदारसंघात तीन वाजेपर्यत ३९.९५ टक्के मतदान झाले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेर्पंत ५४ टक्के तर हातकणंगलेमध्ये ५३ टक्के आणि अहमदनगर लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी ४२.२० टक्के मतदान झाले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात ३ वाजेपर्यंत ४५.१० टक्के मतदान झाले. तर पुणे लोकसभा मतदार संघामध्ये तीन वाजेपर्यंत सुमारे ३३.०४ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.

Leave a Comment